धामोड : राधानगरी मतदार संघातील शेतकरी व युवकांच्या जीवनात धवलक्रांती आणण्यासाठी धामोड येथील सह्याद्री साखर कारखाना व भुदरगड तालुक्यातील देवर्डे येथील साखर कारखान्याची उभारणी निवडणुकीनंतर करणार असल्याची घोषणा आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. ते धामोड येथील विराट जाहीर सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवणे होते; तर प्रमुख उपस्थित राधानगरी तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, ‘गोकुळ’चे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, आर.पी.आय.चे प्रदेश सचिव शहाजी कांबळे होते.
आमदार आबिटकर पुढे म्हणाले, के. पी. पाटील यांनी माझी व माझ्या कुटुंबीयांची नाहक बदनामीचे सत्र सुरू केले आहे. त्यांच्या भाषणाची सुरुवातच बेताल वक्तव्याने होते. त्यांची वक्तव्येच त्यांचा पराभव करतील.
बाळासाहेब नवणे म्हणाले तुळशी-धामणी खोर्यातून निर्माण झालेले वारे जिल्ह्याचे वारे फिरवते. सभेची गर्दी ही आबिटकर यांच्या विजयाची नांदी आहे. विठ्ठलराव खोराटे म्हणाले, प्रतिस्पर्धीला दोन वेळा चितपट केले असून, पैशाच्या जोरावर के. पी. निवडणूक लढवत आहेत. गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे म्हणाले, के. पी. पाटील दहा वर्षांत किती वेळा आले, आत्मचिंतन करावे. तुम्हाला संधी मिळाली; पण तिचे सोने करता आले नाही, के. पीं. चे पुस्तक कोरे आहे.
‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, आर. पी. आय.चे प्रदेशाध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, दीपक शेट्टी, विठ्ठल हुंबे, स्वप्निल मोरबाळे, रघुनाथ कांबळे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. सुभाष जाधव यांनी केले. ‘भोगावती’चे माजी संचालक बी. आर. पाटील, पवन महाडिक, संभाजी आरडे, शेखर पाटील, तानाजी चौगुले, दगडू चौगले, संदीप चौगले, संतोष पाटील, के. एल. पाटील, रंगराव कांबळे, राजेंद्र सावत, डॉ. विश्वास बिडकर, राजाराम सासमल, बी. आर. पाटील, माधव नवणे, मारुती खामकर, दीपक पाटील, संदीप चौगले, जितेंद्र कांबळे, संजय नकाते, आनंदराव कवडे, प्रकाश पाटील उपस्थित होते.
तुळशी-धामणी खोरे हिमालयासारखे पाठीशी...
2014 पूर्वी या परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय होती. या परिसराच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळेच माझी घट्ट नाळ जोडली आहे. त्यामुळेच तुळशी-धामणी खोर्यातील स्वाभिमानी जनता माझ्या पाठीशी हिमालयासारखी असल्याचे आ. आबिटकर यांनी सांगितले.