Published on
:
24 Nov 2024, 12:41 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:41 am
सांगली : विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीला 5, तर महाविकास आघाडीला 3 जागा मिळाल्या. शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), जतचे आमदार विक्रमसिंह सावंत (काँग्रेस) यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांच्या मताधिक्यात मोठी घट झाली. सांगली जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. भाजपने सर्वाधिक 4 जागा जिंकून ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ बनण्याचा मान पटकावला आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला यावेळी दोन जादा जागा मिळाल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 2 जागा जिंकल्या. त्यांनी शिराळ्याची जागा गमावली. काँग्रेसने 1 जागा जिंकली, तर एक गमावली. शिवसेनेने खानापूरची जागा कायम ठेवली.
शिराळ्यात नाईक यांचा पराभव
शिराळा मतदारसंघात भाजपचे सत्यजित देशमुख विजयी झाले. त्यांना 1 लाख 30 हजार 738 मते मिळाली. त्यांचे विरोधक मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) यांना 1 लाख 8 हजार 49 मते मिळाली. देशमुख यांना 22 हजार 689 मताधिक्य मिळाले.
इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना 1 लाख 9 हजार 879 मते मिळाली. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) निशिकांत पाटील यांना 96 हजार 852 मते मिळाली. जयंत पाटील 13 हजार 27 मतांनी विजयी झाले. जिल्ह्यातील हे सर्वात कमी मताधिक्य आहे.
सांगलीत गाडगीळ यांची हॅट्ट्रिक
सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांना 1 लाख 12 हजार 498, तर काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना 76 हजार 363 मते मिळाली. काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना 32 हजार 736 मते मिळाली. गाडगीळ 36 हजार 135 मतांनी विजयी झाले. त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे.
मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पालकमंत्री सुरेश खाडे यांना 1 लाख 29 हजार 766 मते मिळाली. शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार तानाजी सातपुते यांना 84 हजार 571, तर वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यांना 5 हजार 528 मते मिळाली. भाजपचे खाडे 45 हजार 195 मतांनी विजयी झाले.
शिवसेनेचे सुहास बाबर जिंकले
खानापूर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर यांना 1 लाख 53 हजार 892 मते मिळाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील यांना 75 हजार 711, तर अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना 13 हजार 958 मते मिळाली. सुहास बाबर 78 हजार 181 मतांनी विजयी झाले. जिल्ह्यातील हे सर्वाधिक मताधिक्य आहे.
आबांचा रोहित जिंकला, माजी खासदार पराभूत
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांना 1 लाख 28 हजार 403 मते मिळाली, राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांना 1 लाख 759 मते मिळाली. रोहित पाटील हे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव असून त्यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्यावर 27 हजार 644 मतांनी विजय मिळवला.
पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांना 1 लाख 30 हजार 769 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 1 लाख 705 मते मिळाली. डॉ. कदम हे 30 हजार 64 मतांनी विजयी झाले.
जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचा पराभव झाला. त्यांना 75 हजार 497 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 1 लाख 13 हजार 737 मते मिळाली. भाजप बंडखोर उमेदवार तम्मनगौडा रवी-पाटील यांना 19 हजार 426 मते मिळाली. पडळकर 38 हजार 240 मतांनी विजयी झाले.