सावधान...डिजिटल अंधश्रद्धा! भोंदूबाबा सोशल मिडीयावर शोधतायत सावज

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

27 Nov 2024, 3:03 am

Updated on

27 Nov 2024, 3:03 am

नरेंद्र राठोड, ठाणे

ज्ञानाचा अभाव समाजात अंधश्रद्धा पसरवतो. या अंधश्रद्धामुळे मनुष्य व समाज आंतरिक स्तरावर कमकुवत बनतो. अशा वेळी समाजातला मोठा समूह अशा गोष्टींवर विश्वास करू लागतो ज्याचं वास्तवात कुठेही अस्तित्व नसतं. अशा अंधश्रद्धाळू लोकांना हेरून त्यांना मूर्ख बनवणार्‍या भोंदूमंडळींची येथे कमतरता नाही. लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा उठवून फसवणुकीचा बाजार मांडून बसलेली ही भोंदूमंडळी काळानुसार बदलत आहे. हल्लीच्या काळात सोशल मीडियावर सावज हेरणे सोपे झाल्याने भोंदूगिरी करणारे देखील डिजिटल झाले आहेत.

सध्याच्या सोशल मीडिया युगात आपल्या व्यापार-व्यवसाय तसेच कलागुणांना हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहचवणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे अनेकांचे आयुष्य देखील पूर्णतः बदलून गेले आहे. मात्र, सोशल मीडियाद्वारे जशा चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचतात तशाच काही वाईट बाबी देखील पोहचतात. तंत्रमंत्राद्वारे नशीब बदलवून देतो असे व्हिडीओ बनवून ते यूट्यूब व सोशल मीडियावरून प्रसारित करून लोकांना गंडा घालणार्‍या भोंदूमंडळींचा सध्या सुळसुळाट झाला आहे. त्यातच काही मंडळी बोलेबाबा स्पर्शीत रुद्राक्ष, पारसरत्न, नजरबंद यंत्र असे विविध नकली वस्तू सोशल मीडियावर सर्रास विक्री करीत आहेत. इतकेच नव्हे तर काही भामट्यांनी तर बागेश्वर बाबा, पंडोखर सरकार अशा धार्मिक संस्थांच्या नावाने फेक कॉल सेंटर सुरू केले आहेत. एक हजार अकरा रुपये ट्रस्टला दान केले तर स्वतः बाबा आपल्याला फोनवरून आशीर्वाद देतील, असे लोकांना फोन करून काही मंडळी सांगतात आणि फेक माणसाला बोलायला लावून लोकांना फसवतात. राज्यात आतापर्यंत बाबा मंडळींच्या नावाने फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीच्या अनेक युक्त्या सायबर भामट्यांनी शोधून काढल्या आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत सायबर गुन्हेगारांचा उपद्रव प्रचंड वाढला असून हे भामटे फसवणुकीच्या नवनवीन कल्पना अमलात आणून अनेक सर्वसामान्यांची फसवणूक घडवून आणत आहेत. याच सार्‍या फसवणुकीच्या बाजारात आता सायबर चोरट्यांनी एक नवा फंडा शोधून काढला आहे, तो म्हणजे अंधश्रद्धेचा ऑनलाईन पॅटर्न. एक हजार अकरा रुपये बाबांच्या ट्रस्टला ऑनलाईन दान करा आणि साक्षात बाबांचा फोनवरून आशीर्वाद प्राप्त करा. तसेच स्वतः बाबांनी आपल्या सिद्धीने सिद्ध केलेले रुद्राक्ष, पारसरत्न, अंगठी असे विविध नकली वस्तूंची सर्रास विक्री केली जातेय. खास करून सोशल मीडियावर सायबर भामटे लोकांना हेरतात आणि त्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. लोकांना गंडवण्यासाठी काही ठिकाणी तर चक्क या बाबा मंडळींच्या नावाने कॉल सेंटर्स उघडण्यात आली आहेत. या कॉल सेंटरमधून ग्राहकांना हेरणे आणि नकली बाबांकडून त्यांना फोनवरून आशीर्वाद दिली जातात. राज्यात गेल्या काही काळात फसवणुकीच्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

काही काळापूर्वी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका भोंदू बाबाने एका अल्पवयीन मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला होता. कुलदीप प्रदीप निकम (पोखरण रोड, वर्तकनगर, ठाणे) असे त्या भोंदूबाबाचे नाव होते. त्याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने एका अल्पवयीन मुलाचा शारीरिक छळ करून तिचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात मुख्य आरोपी व त्याचे साथीदार यांनी भूत प्रेत यांचा शोध घेऊन स्वतः तंत्रमंत्राद्वारे त्यातून मुक्ती मिळवून देतो, असे व्हिडीओ बनवून ते यूट्यूबवरून प्रसारित करून अनेक लोकांना गंडा घातल्याचे समोर आले होते. त्याने या भोंदूगिरीच्या कामासाठी दत्त प्रबोधिनी नावाची संस्था बनवली होती. तसेच त्याने परानॉर्मल रेस्क्युअर सोसायटी नावाचे यूट्यूब चॅनल व सोशल मीडिया पेजेस देखील बनवले होते. विशेष म्हणजे या बाबाकडून सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणार्‍या प्रत्येक व्हिडीओ व पोस्टला हजारो लाखोंच्या घरात व्ह्यूज व लाईक मिळत असत.

पोलिसांनी या बाबाच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात सापाचे कातडे, घोस्ट डिटेक्टर मशिन, महागडे लॅपटॉप, नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे, तंत्रमंत्र विद्येची पुस्तके, त्रिशूळ, होमहवन, काळ्या बाहुल्या, कावळ्याचे पंख असे साहित्य मिळून आले होते. या घटनेनंतर भोंदूबाबा देखील डिजिटल होत असल्याचे स्पष्ट झाले. कधीकाळी हे भोंदूबाबा ट्रेन, बस स्टॅण्ड आदी ठिकाणी जाहिरात करून आता पर्यंत आपले सावज हेरत होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळानंतर हे भोंदूबाबा सोशल मीडियाचा उपयोग करून संकटात सापडलेल्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी अनेक ढोंगी बाबा मंडळींनी ठाणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरात आपली कार्यालये थाटून लोकांना गंडवण्याचा धंदा सुरू केला आहे. हे भोंदूबाबा ब्लॅक मॅजिकच्या नावाने सावज हेरताना खास करून संकटात अडकलेली माणसे शोधतात.

एकीकडे जादूटोणा कायद्याच्या अंमलबजावणीविषयी शासन कठोर पावले उचलत असतांनाच भोंदूबाबांनी हा कायदा धाब्यावर बसवला आहे. काही बाबा मंडळी टीव्हीवर खुलेआम वशीकरण यंत्र, धनलाभ यंत्र, सुखशांती यंत्र आणि इतर तंत्र मंत्र अशा उत्पादनांची जाहिरात करतात. भोंदूबाबा व जादूटोणा करणार्‍या मंडळींचा वाढता उपद्रव लक्षात घेता शासनाने 31 मे 2015 रोजी काढलेल्या अध्यादेश नुसार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस मुख्यालयात जादूटोणा विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण कक्षातील पोलिस निरीक्षक या कक्षेचा नियंत्रण अधिकारी असतो. तर दक्षता अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षकाची नेमणूक करण्यात येते. जादूटोणा विरोधी कायदानुसार अंधश्रद्धा पसरवणे हा गुन्हा दखलपात्र असून या गुन्ह्यात दोषी आढळल्यास एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

भूत प्रेताचे सावट, करणी, वशीकरण, गुप्तधन अशा विविध करणाखाली ही बाबा मंडळी लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. सुरुवातीला हे बाबा मांडूळ जातीचा साप, पुरातन काळातील माकडछाप नाणे, कास्य धातूच्या वस्तू, घुबडाचे अंडे, वीस नखांचा कासव अशा मिळण्यास अतिशय अवघड वस्तूंची मागणी करतात. याच वस्तूंवर मांत्रिक जाप करून दोष दूर होतो अथवा जमिनीतले धन वर येते हे नीट पटवून दिले जाते. ह्या वस्तूपैकी काही वस्तू मिळाल्यावरही अनेक वेळा त्याचा काहीही परिणाम समोर येत नाही. मग ह्या बाबांकडून गुप्तधनाचे रक्षण कुणी दैवी शक्ती करीत आहे आणि या दैवी शक्तीला प्रसन्न करण्यासाठी नरबळी द्यावे लागेल, असे सांगण्यात येते आणि येथेच घडते नरबळी देण्यासारख्या अघोरी घटना. काही भोंदूबाबा आम्ही पैशाचा पाऊस पाडून देतो, असा प्रचार करतात.

त्यातून महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि नरबळी असे गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या टोळीस ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेड्या ठोकल्या होत्या. करोडो रुपये मिळतील, असे आमिष दाखवून या टोळीने आपल्या जाळ्यात सतरा मुलींना ओढले होते. गरीब मुली व महिलांना हेरून ही भोंदू मंडळी त्यांना मोबाईलमध्ये चित्रित केलेला एक व्हिडीओ दाखवत होते. ज्यात एक महिला नग्न अवस्थेत झोपलेली असून तिच्या शेजारी पैशांचा ढिगारा लागलेला आहे, असे दाखवण्यात आले होते. ही भोंदूबाबा मंडळी पूजाविधीस बसलेल्या मुलीसोबत शारीरिक अत्याचार करायचे. ही टोळी राज्यभरात सक्रिय होती व त्यांनी अशाच प्रकारे अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article