Published on
:
24 Nov 2024, 1:16 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:16 am
सिंधुदुर्ग जिल्हा राणेंचाच... हे या निवडणूक निकालानंतर ठळकपणे अधोरेखित झाले आहे. नितेश राणे कणकवलीतून तिसर्यांदा निवडणूक जिंकतानाच नीलेश राणे यांनी 8176 इतक्या मताधिक्याने का असेना महत्त्वाचा विजय मिळविला आहे. एवढेच कशाला ज्यांच्या मागे राणे यांनी आपले संघटन आणि ताकद उभी केली होती त्या दीपक केसरकर यांचाही मोठा विजय सावंतवाडीत झाला आहे. परिणामस्वरूप राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणावर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. किमान पुढची दहा वर्षे राणे यांचे वाढते प्रस्थ जिल्ह्याच्या राजकारणात कायम राहील, असे भाकित वर्तविता येईल इतकी पोषक परिस्थिती राणे यांच्यासाठी या निकालानंतर निर्माण झाली आहे.
मोदी सरकारची तिसर्यांदा केंद्रात आलेली सत्ता, खासदार नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतलेले लाखभर मताधिक्य, राज्यातील भाजपची सत्ता, सत्तेची ताकद, लाडकी बहीण योजना, हिंदुत्वाचा मुद्दा या सर्व जमेच्या बाजू महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने होत्या. त्याशिवाय राणे यांचे जिल्ह्यात असलेले मजबूत संघटन, केवळ निवडणुकांपुरते राजकारण न करता सतत अॅक्टिव्ह राहणं आणि प्रत्यक्ष निवडणुकीत प्रभावी, रचनात्मक प्रचार यंत्रणा राबवणारी स्ट्रॅटेजी, या महत्वाच्या बाबी राणे बंधू आणि केसरकर यांच्या विजयाला कारणीभूत ठरल्या. नितेश राणे यांनी कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघात राबविलेली प्रभावी प्रचार यंत्रणा त्यांना मोठा विजय मिळण्यास कारणीभूत ठरली. स्वत: खासदार नारायण राणे यांनी घेतलेली मेहनत, तेथील भाजप व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी एकत्रित येऊन राबविलेली प्रचार यंत्रणा यामुळे नीलेश राणे यांचा विजय झाला. सावंतवाडीत तर दीपक केसरकर यांचे स्वत:चे गुडविल आहेच, त्यात राणे यांची ताकद त्यांना मोठा विजय देण्यास कारणीभूत ठरली.
महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे शिवसेनेचे तीनही उमेदवार महायुतीशी लढले खरे, परंतु संघटन कमी पडले. कणकवलीत तर संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर झाली ती अगदी निवडणुकीच्या तोंडावर. त्यात पुन्हा कणकवली, देवगड, वैभववाडी या तीनही तालुक्यात ठाकरे शिवसेनेचे संघटन तुलनेने खूपच कमी होते. त्यामुळे नितेश राणे यांचा एकतर्फी विजय होणार हे अगोदर स्पष्ट झाले होते. कुडाळमध्ये वैभव नाईक महायुतीला टक्कर देत होते. परंतु राणे यांच्या बाजूने असलेल्या अनेक बाबींचा सामना नाईक यांना करावा लागला होता. घराणेशाही हा मुद्दा तर चाललाच नाही, त्याशिवाय पुतळा दुर्घटना प्रकरणाचाही फारसा परिणाम झाला नाही. राजन तेली हे ऐनवेळी भाजप सोडून शिवसेनेत गेले, त्यांना ठाकरे शिवसेनेचे जे संघटन होते तेच घेऊन लढावे लागले. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना अंतर्गत अशी फारशी मदत झाली नाही. रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांना केसरकर यांच्या बाजुने चार्ज केलेच होते.
राजकारणात पराभव झाला तरी हार न मानता सतत कार्यरत रहावे लागते. दहा वर्षापूर्वी राणे यांचा कुडाळमध्ये पराभव झाला होता. नीलेश राणे यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु ते थांबले नव्हते. सतत अॅक्टिव्ह राहत अनेक राजकीय निर्णय त्यांनी घेतले. गरज वाटली तेव्हा स्वत:चा पक्ष काढला. एका निर्णायक वळणावर तो पक्ष विसर्जित करून भाजपमध्ये प्रवेश केला. अशा एका राजकीय परिस्थितीमध्ये आताच्या निवडणुुकीत नीलेश राणे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढविली. राणे कुटुंबीयांनी जोरदार मेहनत घेतली आणि पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व निर्माण केले.
ठाकरे यांच्या हातून मात्र कोकण निसटला आहे. ठाकरे यांचा शिवसेनेचा तळकोकण हा बालेकिल्ला आता राहीला नाही. तळकोकणातील रत्नागिरीमध्ये सामंत बंधूंनी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे बंधुनी विजय मिळवत आता ठाकरे शिवसेनला खूप मागे रेटले आहे. देशात प्रभावी बनत चाललेल्या भाजप सोबत जोवर ठाकरे होते तोवर त्यांचा प्रभाव कोकणवर होता. जेव्हा भाजपची साथ सोडली तेव्हापासून आपसूकच कोकणचा मतदार हळूहळू ठाकरेंपासून दूर होत गेला. या मतदारांनी महायुतीत असलेल्या राणे व सामंत यांना साथ दिली, असे म्हणता येईल. पक्षफुटी, पक्षांवरील दावा, गद्दारीचा आरोप, निवडणूक आयोगाचे निर्णय हे मुद्दे या निवडणुुकीत फारसे प्रभावी ठरले नाहीतच त्याशिवाय रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोधही ठाकरे शिवसेनेला उपयोगी पडला नाही. संपूर्ण राज्यातच महायुतीची लाट आली, असे म्हणता येईल. या लाटेत महाविकास आघाडीने जे मुद्दे पुढे केले ते सर्व वाहून गेले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि त्यावेळच्या अखंड शिवसेनेला जिल्ह्यात समसमान मते मिळाली होती. या विधानसभा निवडणुकीत मात्र ठाकरे शिवसेनेला 1 लाख 64 हजार 954 इतकी तर भाजप आणि शिंदे शिवसेनेची मिळून 2 लाख 71 हजार 36 इतकी मते मिळाली आहेत. याचाच अर्थ 55 टक्के मतदान महायुतीला तर 34 टक्के मतदान महाविकास आघाडीला झाले आहे. बंडखोर उमेदवारांनी 8 टक्के मते मिळविली आहेत. यावरून ठाकरे शिवसेना किती बॅकफूटवर गेली आहे लक्षात येईल. हे खरे आहे की वैभव नाईक यांनी एकाकी आणि निकराची लढाई दिली. उद्धव ठाकरे यांच्या तीन सभा एकाच दिवशी झाल्या. पुतळा पडल्याचे प्रकरण त्यांनी ऐरणीवर आणले. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे त्यांनी आवर्जुन सांगितले. परंतु सिंधुदुर्गात त्यांच्या सभा विजयापर्यंत नेऊ शकल्या नाहीत. किंबहुना ठाकरे शिवसेना आता बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढचा राजकीय प्रवास खडतर आहे.
राजन तेली यांना सावंतवाडीत केसरकरांशी लढत देताना भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेले 31 हजाराचे मताधिक्य तोडायचे होते. परंतु ते त्यांना शक्य झाले नाही. वैभव नाईक यांनी मात्र लोकसभेत भाजपला मिळालेल्या 26 हजारांचे मताधिक्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. मात्र विजयापर्यंत पोहोचता आले नाही, तर महायुतीला पुढे सुसाट जाण्यासाठीचा मार्ग तयार आहे. महायुतीप्रमाणे राणे कुटुंबीयांसाठीही हा दिवस आनंदाचा आहे. स्वत: नारायण राणे खासदार आणि दोन्ही सुपुत्र आमदार बनले आहेत. राज्यात आता महायुतीचे सरकार सत्तेवर येईल यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्थात मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद कुणाकडे जाते याचीही उत्कंठा असणारच आहे. आणि ही सुध्दा उत्सुकता आहे की ठाकरे शिवसेनेचे जिल्ह्यातील स्थानिक नेते आता पुढे काय भुमिका घेणार आहेत. एकेकाळी राणे यांच्या सोबत काम केलेले राजत तेली, परशुराम उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, बबन साळगावकर ही सर्व मंडळी या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेतून उतरली होती. आता या पुढे त्यांची वाटचाल कशी राहील हे औत्सुक्याचे ठरेल. एक मात्र खरे आहे पुढील अनेक वर्षे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असो की सहकारी संस्था असो तिथे राणे यांचेच वर्चस्व राहील यात शंका नाही. तूर्त मंत्री कोण-कोण होतय याकडे सर्वांचेच लक्ष आहे.