>> डॉ. समिरा गुजर जोशी
महाभारताच्या तुलनेने रामायणामध्ये थेट राजकारणाची चर्चा कमी असली तरी राजकारणाचे भान असलेले मात्र आपल्याला ठिकठिकाणी दिसते. सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेता नसेल तर राज्यामध्ये कशा पद्धतीने अराजक माजते याची रामायणामध्ये आलेली चर्चा पाहणे उद्बोधक ठरावे. राजा दशरथाचा मृत्यू झाल्यानंतर आणि राम वनवासात गेल्यानंतर अयोध्येमध्ये अशी अराजकाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रसंगी रामानंतर नियोजित राजा जरी भरत असला तरी तो अयोध्येमध्ये उपस्थित नव्हता. अशा वेळेस राज्याला राजा नसेल तर त्यावर संकटे चहूबाजूंनी येऊ शकतात. त्याविषयीची चर्चा राजा दशरथाच्या मंत्रिमंडळाने केली आहे.
ज्या राज्याला सक्षम नेतृत्व नसते तिथे कोणत्याही प्रकारचे संतुलन उरत नाही. निसर्गाचेही संतुलन बिघडून अशा राज्यात दुष्काळ पडण्याची भीती असते. शेतीकडे दुर्लक्ष होते. इतकेच नाही तर कुटुंबातही कोणाचा कोणाला धाक राहत नाही. संपत्ती तसेच स्त्रिया सुरक्षित नसतात. याबाबतीत काही बारकावे सांगितले आहेत, जे आजही सुसंगत वाटावे.
अशा राष्ट्रांमध्ये सार्वजनिक सभा भरवल्या जात नाहीत. कारण अशा ठिकाणी सर्वानुमते विचार केला जात नाही. दंडेलशाहीचाच अवलंब केला जातो. अशा ठिकाणी राष्ट्रीय उत्सव साजरे केले जात नाहीत. समाजामध्ये उत्सव साजरा होणे यासाठी शांततापूर्ण स्थिर वातावरण अपेक्षित असते. नेतृत्वाच्या अभावी असे सुरक्षित वातावरण या राष्ट्रांतून नसते. त्याचाच परिणाम म्हणजे स्त्रिया अलंकार घालून उघडपणे वावरूही शकत नाहीत. व्यापार करणारे सुरक्षित प्रवास करू शकत नसल्यामुळे व्यापाराचे प्रमाण कमी होते. शेतकरी आपल्या घरांची दारे उघडी टाकून निजूही शकत नाहीत. कुटुंबांचे दूरवर प्रवास करणे, तीर्थाटन यावरही बंधने येतात. कुणालाच आपल्याकडील पैशांची खात्री वाटत नाही. अशा ठिकाणी केवळ मत्स्य न्याय काम करतो. म्हणजे मोठा मासा छोटय़ा माशाला गिळंकृत करतो, त्याप्रमाणे बलवान समाजातील दुर्बलांना काबीज करतात. उत्तम नेतृत्व समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करते ही गोष्ट इथे अधोरेखित केलेली आहे.
लोकशाहीत लोकांना नेतृत्व निवडण्याचा अधिकार आहे, पण राजालादेखील लोकांचा पाठिंबा असणे तितकेच गरजेचे आहे. रामायणात जरी राजसत्तेचे वर्णन असले तरी ती निरंकुश राजसत्ता नाही. लोकमताला तिथे मोठी प्रतिष्ठा आहे. लोकांचा पाठिंबा नसेल तर राजा दीर्घकाळ राज्य करू शकणार नाही ही मान्यता तेथे आहे. राजाने कोणताही निर्णय घेताना आपल्या मंत्र्यांचा सल्ला तर घ्यायचा आहेच, पण लोकांचे मतही समजून घ्यायचे आहे. रामाला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेताना जनमत त्याच्या बाजूने आहे या गोष्टीचा विचार झाला होता. जेव्हा रामाला वनवासात पाठविण्याचा निर्णय राजा दशरथाने घेतल्याचे कळते तेव्हा लक्ष्मण याच बाबीचा पुनरुच्चार करतो. जनतेला प्रिय असणाऱया रामाला त्याचा काहीही गुन्हा नसताना तुम्ही राज्याबाहेर काढत आहात. हा निर्णय घेऊन तुम्हाला लोकांचे प्रेम कसे मिळेल? असा त्याचा रोखठोक सवाल आहे. जनतेची शक्ती काय असते हे यावरून स्पष्ट व्हावे. कारण ज्या राजाला लोकांचे मन जिंकता येत नाही अशा राजाचे राज्य फितुरीसाठी आयते कुरण म्हटले पाहिजे. अशा राजाचा पराभव करणे शत्रूंना सहज शक्य होते. अंतर्गत बंडाळी होण्याची भीती सतत असते ती वेगळीच.
याच दृष्टीने भरताने सांभाळलेल्या राज्याकडे पाहता येते. रामाचा विश्वस्त म्हणून भरताने राज्यकारभार पाहिला. त्याने राज्याला समृद्ध स्वरूप प्राप्त करून दिले. त्याचे स्वतचे राहणे मात्र तपस्वी व्यक्तीला शोभावे असे होते. स्वत प्रभू श्रीरामांनी अयोध्येत प्रवेश करण्याआधी हनुमंताला दूत म्हणून भरताकडे पाठविले आहे. “मी येतो आहे’’ हा निरोप ऐकल्यानंतर भरताची प्रतिक्रिया काय होते याचे नीट निरीक्षण करून मला सांग, अशी त्यांची सूचना आहे. कारण चौदा वर्षे राज्य सांभाळल्यावर आता भरताला राजसत्तेचा मोह झालेला असू शकतो. अर्थात हे जाणून घेण्यामागे प्रभू श्रीरामांचा हेतू हा आहे की, जर त्याला राज्य हवे असेल तर भरताला अयोध्येचे राज्य सांभाळू दे, पण त्याची इच्छा काय आहे हे जाणून घ्यावे. राजसत्तेचा मोह कसा असतो याचे भान या ठिकाणी दिसून येते.
हनुमंताला प्रत्यक्षात काय पाहायला मिळाले? भरताची आणि त्याची भेट झाली ती अयोध्येत नव्हे, तर नंदिग्राममध्ये. आजही अयोध्येजवळ हे स्थळ पाहावयास मिळते. तिथे पोहोचेपर्यंत वाटेत हनुमंतरायांना समृद्ध शेते दिसली. गावाबाहेरच्या उद्यानातही नटून-थटून आलेले स्त्री-पुरुष हसत खेळत फिरताना त्याने पाहिले. अराजक असले तर जे वातावरण असते त्याच्या विरुद्ध वातावरण उत्तम नेतृत्व लाभल्यावर कसे निर्माण होते याचा अंदाज यावरून यावा. आता इतक्या समृद्ध राज्याचा राजाही तितक्याच ऐटीत भेटेल अशी त्याची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात भरत भेटला तो मात्र तापसी वेषात. जटाधारी आणि कृश झालेला भरत राम परतणार या बातमीने इतका प्रसन्न झाला की, त्याने ही बातमी सांगणाऱया हनुमंतरायांना एक लाख गायी आणि शंभर गावे बक्षीस देतो, असे सांगितले. रामराज्याविषयी आपण वारंवार बोलतो, पण असे भरतराज्यही जगाच्या पाठीवर दुसरे सापडणार नाही. रामानंतर अयोध्येत अराजक निर्माण झाले नाही याला कारण भरताचा त्याग हे विसरता येणार नाही. कैकयीमुळे जो लोकांच्या संतापाचे कारण ठरला होता तो त्यांच्या प्रेमाला पात्र ठरला. त्याने स्वत राज्य न स्वीकारता रामाचे राज्य म्हणून ते सांभाळले. त्यामुळे तो भले राजा झाला नसेल, पण उत्तम नेता मात्र नक्की ठरला.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)