Published on
:
05 Feb 2025, 12:34 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:34 am
कोल्हापूर : केंद्रीय बजेटनंतरही सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. मंगळवारी (दि. 4) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 86,000 रुपये झाला असून सोने दराने आतापर्यंतचा विक्रम मोडला आहे; तर चांदीचा दर 96,700 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर ठरला आहे. जीएसटी वगळून कोल्हापूर सराफ बाजारातील 24 कॅरेट सोन्याचा दर 83,500 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा दर 93,880 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वधारले असून, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण, व्याज दर कमी राहण्याची शक्यता आणि गुंतवणूकदारांचा ओढा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढल्याने सोने, चांदीची दरवाढ झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अस्थिरता, महागाईची भीती आणि भारतातील लग्नसराईच्या हंगामामुळे स्थानिक बाजारातही सोने-चांदीची मागणी वाढली आहे. या सर्व कारणांमुळे सोने-चांदीचे दर उच्चांक गाठत आहेत. हा ट्रेंड या लग्नसराईत कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेने आंतरराष्ट्रीय व्यवहारात करवाढ करण्याचा निर्णय केल्यामुळे ही दरवाढ केल्यामुळे सोमवारच्या तुलनेत सोने दरात 600 रुपयांची वाढ झाली. 2024 मध्ये 31 ऑक्टोबर रोजी सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 81700 झाला होता. हा विक्रम अलीकडेच मोडला असून 4 फेब—ुवारी रोजी दराचा नवा विक्रम नोंदवला गेला.