आ. सुभाष देशमुखFile Photo
Published on
:
24 Nov 2024, 1:04 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:04 am
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आ. सुभाष देशमुख हे तिसर्यांदा निवडून आले आहेत. लिंगायत, मराठा, धनगर, मुस्लिमसह अन्य समाजही भाजपच्या पाठिमागे भक्कमपणे उभा राहिल्याचे दिसून आले. लिंगायत समाजातील मतविभागणी करण्यात शिवसेना उबाठाचे अमर पाटील, सिध्देश्वर परिवाराचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना यश आले नाही. उलट देशमुख यांना लाडक्या बहिणींचाही चांगली साथ मिळाल्याचे निकालातून दिसले. दक्षिण सोलापूर भाजपचेच हे निकालातून दिसून आले.
शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सोलापूरच्या दौर्यात अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतू नंतर काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली. यादीत त्यांचे नाव आहे. परंतु त्यांना एबी फॉर्म दिला नाही. तर दुसरीकडे धर्मराज काडादी यांनी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आशीर्वाद असल्याचे सांगत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे लिंगायत समाजातील मतांची विभागणी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु तसे निकालात दिसून आले नाही. दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊन ते प्रचारात सक्रिय होते. परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी भाजपचे सुभाष देशमुख यांच्या प्रचारात सक्रीय होती. उत्तर सोलापूर तालुक्यातील गावे आणि मराठा समाजदेखील भाजपच्या पाठीशी असल्याचे दिसून आले.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांना नऊ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यंदा देशमुखांच्या विरोधात नाराजी असल्याची वातावरण निर्मिती असल्याचे भाजपअंतर्गत विरोधकांनी उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला होता. परतु पक्षाने देशमुखांनाच उमेदवारी दिली. यंदा 75 हजारांहून अधिकचे मताधिक्य घेत देशमुखांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. दक्षिण सोलापूर मतदारसंघात नीलमनगर, नई जिंंदगी, जुळे सोलापूर, उत्तर सोलापूरमधील दहा गावे, दक्षिण सोलापूरमधील 59 गावे असा शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. यात उच्चशिक्षित, कामगार, शेतकरी, शेतमजूर अशा विविध स्तरातील मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातच भाजपला आघाडी मिळाली आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ तसा काँग्रेसा बालेकिल्ला होता. याठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे विजयी झाले होते. त्याबरोबर या मतदारसंघात (कै.) आनंदराव देवकते अनेकदा आमदार झाले. त्यांना मंत्रिपदही मिळाले होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत मतदारसंघात पहिल्यांदाच सुभाष देशमुख यांच्यारूपाने कमळ फुलले. तीच परंपरा त्यांनी 2019 च्या निवडणुकीतही कायम ठेवली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत याठिकाणी काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल काय येणार याची उत्सुकता होती. मात्र, आ. देशमुख यांनी हॅट्ट्रिक करत विजयश्री मिळविली आहे.