Published on
:
05 Feb 2025, 12:51 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:51 am
सोलापूर : मध्य रेल्वे विद्युतीकरणाची शंभर वर्षे पूर्ण करत आहे. पण, मध्य रेल्वेतील सोलापूर विभागात जून 2014 मध्ये वाडी यार्ड येथून पहिले रेल्वे इंजिन विद्युतीकरणावर धावले. यामुळे मध्य रेल्वेतील सोलापूर विभागातदेखील 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण करणारा विभाग ठरला आहे.
स्वतंत्र पूर्व काळात इंग्रजांच्या राजवटीत 3 फेब्रुवारी 1925 ला भारतीय रेल्वे मधील विद्युतीकरणावर चालणारे देशातील पहिले इंजिन मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनस आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला रेल्वे लोहमार्गादरम्यान धावली. या घटनेला 3 फेब्रुवारी 2025 रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. सर्वात प्रथम इंग्रजांच्या राजवटीत कोळशाचे इंजिन सुरु झाले. त्यापाठोपाठ डिझेल इंजिन एकंदरीत या दोन्हीही इंजनचा इतिहास पाहता कोळशाचे आणि डिझेल इंजिन लोहमार्गावरून धावत असताना दोन्ही इंजिनच्या दोरखंडातून दूर निघत असे. त्यामुळे हवेत वायू प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक होते. या सर्व बाबींचा विचार करून इंग्रज राजवटीत रेल्वे प्रशासनाने विजेवर धावणार्या रेल्वे इंजिनचा शोध लावला आणि हळूहळू कोळशावरील इंजिन आणि डिझेल इंजिन रेल्वेच्या इतिहासात लोप पावले.
सोलापूर विभागाने विद्युतीकरणात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ज्याचा परिणाम 100 टक्के विद्युतीकरणापर्यंत पोहोचला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यात सोलापूर ते मुंबई आणि कलबुर्गी ते बंगळुरु अशी वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा इलेक्ट्रिकल टॅक्शन अंतर्गत सुरू केल्याने रेल्वे नेटवर्क आणखीन मजबूत झाले आहे. ज्यामुळे प्रवाशांना जलद, आधुनिक आणि कार्यक्षम प्रवासाचा अनुभव मिळत आहे. विद्युतीकरण शताब्दी समारंभानिमित्त सोलापूर रेल्वे विभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात विभागीय रेल्वे कार्यालय ते स्टेशन येथे प्रतिकात्मक वॉकेथॉन आयोजित करण्यात आला होता.
वृक्षारोपण करण्यात आले. यात विभागातील विविध विद्युत कार्यालयामध्ये 100 डाळींबांची झाडे लावण्यात आली. शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्युतीकरण शताब्दी साजरे करण्यासाठी विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकावर विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच विभागीय रेल्वे कार्यालयाच्या संगम कॉन्फरन्स हॉलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यात विद्युतीकरणाचे ऐतिहासिक महत्त्व, यश आणि भविष्यातील दृष्टिकोन यावर चर्चा करण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ सुजित मिश्रा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार, अभिषेक एस चौधरी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर विभागातील विद्युतीकरणाचा प्रवास
वाडी यार्ड (जून 2014 मध्ये)
वाडी ते कलबुर्गी (मार्च 2018 मध्ये)
कलबुर्गी ते सोलापूर (2021 मध्ये)
मिरज ते औसा रोड आणि सोलापूर ते दौंड (2022 मध्ये)
औसा रोड ते लातूर (फेब्रुवारी 2023 मध्ये)