सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट:खामगाव पोलिसांनी केला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
2 hours ago
1
निवडणूक काळात अफवा पसरवणे, खोटे व्हिडीओ व पोस्ट व्हायरल करणे, धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकणे अनेकांना चांगलेच महागात पडू शकते. खामगाव शहरातील जवळपास प्रत्येक ग्रुपमध्ये एकतरी पोलिस कर्मचारी कार्यरत असून सोशल मीडियावर अशा फेक पोस्ट व व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी शहरात धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी तुषार चंदेल यांच्यासह सात जणांविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सतीफैल काँग्रेस या नावाच्या सोशल मीडियावर ग्रुपवर तुषार चंदेल याने खामगाव येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी येणारे खासदार इमरान प्रतापगढी यांच्या रोड शोवर दगडफेक होईल, अशी अफवा पसरवणारी पोस्ट टाकून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत असे कृत्य करणाऱ्या तुषार चंदेलसह सोशल मीडिया ग्रुपचे महानंद यादव व इतर ७ जणांविरुध्द भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकल्याप्रकरणी वाडी येथील निखिल देशमुख याच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला चांगलाच "प्रसाद ' दिल्याची माहिती आहे. निवडणूक काळात खामगाव शहरात आतापर्यंत असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगत अशा पोस्ट टाकू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीडियाचा वापर करताना दक्षता बाळगा सोशल मीडियावर अति उत्साहीपणा दाखवणाऱ्या युवकांनी सावधान राहण्याची गरज आहे. पोलिसांचे सोशल मीडियावर बारीक लक्ष असून अफवा पसरवणे, फेक व्हिडीओ, फोटो ब्हायरल करणे, धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करणे, आक्षेपार्ह व्हिडिओ व पोस्टर सोशल मीडियावर टाकणे असे कृत्य करणाऱ्यांवर पोलीस स्वत:हून गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे युवकांनी सोशल मीडियाचा वापर करताना दक्षता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)