रत्नागिरी : निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देताना उबाठाचे शिष्टमंडळ.pudhari photo
Published on
:
05 Feb 2025, 12:35 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:35 am
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून सक्ती केली जात असून याविरोधात शिवसेना उबाठा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा रत्नागिरीतील उबाठाच्या पदाधिकार्यांनी दिला.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, विभागप्रमुख, महिला पदाधिकारी मोेठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुनस्कर म्हणाले की, शिवसेना उबाठाचा स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला विरोध आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तीला या मीटरबद्दल काही माहिती नाही. मोबाईलप्रमाणेच स्मार्ट मीटरला प्रीपेडची सुविधा दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र मीटर बसल्यावर ही प्रीपेड सुविधा सुरू केली जाईल. त्यामुळे तुम्ही जेवढे रिचार्ज माराला तेवढीच वीज तुम्हाला मिळणार आहे. रिचार्ज संपल्यास तुम्ही तो करेपर्यंत घरातील वीज बंद राहणार आहे. महावितरणच्या कायद्यानुसार ग्राहकांना त्यांना आवश्यक सुविधा घेण्याचा अधिकार आहे. परंतु महावितरणचे अधिकारी अनेक ठिकाणी जबरदस्ती करीत आहेत, खोटेनाटे सांगून मीटर घेण्यास भाग पाडत आहेत.
रत्नागिरी विभाग हा मीटर उपलब्ध करून देण्याचे काम अदानी कंपनीकडे देण्यात आले आहे. त्यासाठी महावितरणच्या इमारतीत अदानीला कार्यालय सुरु करण्यासही जागा देण्यात आल्याचा आरोप संजय पुनस्कर यांनी केला. गोरगरीबांच्या माथी स्मार्ट मीटर मारु नका असे आवाहन करत, वेळप्रसंगी शिवसेनेचा हिसका दाखवावा लागेल, असा इशाराही पुनस्कर आणि शेखर घोसाळे यांनी दिला. पत्रकार परिषदेनंतर शिवसेना उबाठाच्या सर्व पदाधिकार्यांनी यासंदर्भातील जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.