स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Published on
:
18 Jan 2025, 5:00 am
Updated on
:
18 Jan 2025, 5:00 am
Pune Crime News: स्वारगेट येथील महर्षीनगर परिसरात गेल्या दहा वर्षांपासून बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने केलेली ही कारवाई, व्यक्तीच्या बेकायदेशीर वास्तव्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली.
एहसान हाफिज शेख (३४) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गुलटेकडी येथील महर्षीनगर येथे राहणारा असून मूळचा बांगलादेशचा आहे. तपासाअंती, पोलिसांना आढळले की एहसान 2014 मध्ये बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाला होता आणि तेव्हा पासून तो पुण्यात राहत होता.
विशेष म्हणजे, त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त केले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळविली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षापासून हा इसम कपडे विक्रीचा व्यवसाय करत होता. २०१४ मध्ये त्याने भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर तो पुण्यात वास्तव्याला आहे.
दरम्यान, स्वारगेट पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली.नंतर पोलिसांच्या पथकाने महर्षीनगर परिसरात सापळा लावून शेखला ताब्यात घेतले. घरझडतीत सदर इसमाकडे 7 बनावट आधार कार्ड, 7 पॅनकार्ड, 4 पासपोर्ट, पाकिस्तानी चलनी नोट, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, मलेशियाचे चलन देखील मिळून आले .
वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.पुणे पोलिसांव्यतिरिक्त, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहरातील विविध भागात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या ३३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.