Published on
:
18 Jan 2025, 7:26 am
Updated on
:
18 Jan 2025, 7:26 am
छत्रपती संभाजीनगर : आपल्यावर होणाऱ्या टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा आपण आपले काम करत राहिले पाहिजे. मी माझे काम उत्तम आणि दर्जेदारपणे करत मला मिळालेल्या प्रत्येक भूमेकला न्याय देत आजवरचा सिनेप्रवास केला असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी यावेळी केले. (Ajanta-Ellora International Film Festival)
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आणि दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय सिनेमा स्पर्धेच्या ज्यूरी पर्सन सीमा बिस्वास यांच्याशी प्रा. शिव कदम यांनी आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे मास्टर क्लासमध्ये संवाद साधला.
पुढे बोलताना बिस्वास म्हणाल्या, मला एक प्रतिभाशाली नृत्यांगना व्हायचे होते, मात्र पहिल्यांदा अभिनय केला आणि मला लक्षात आले की, अभिनय हीच गोष्ट आहे जी आपल्याला पुढे करायची आहे. माझा प्रवास मलाच प्रेरक वाटतो, कारण एका छोट्या गावातून सुरू झालेला माझा प्रवास ऑस्करपर्यंत जाऊन पोहचला आहे.
‘बॅन्डिट क्वीन’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी ३ दिवस झोपले नव्हते. आणि मी या विचारावर आले की, ही भूमिका केवळ मीच करू शकते. आणि या चित्रपटात काम करण्याचा अनुभव हा आयुष्यभर लक्षात राहील, असा होता. ‘बॅन्डिट क्वीन’नंतर मला स्वत:ला मी एक वादग्रस्त अभिनेत्री नसून अभिनेत्री आहे, हे सिद्ध करायचे होते म्हणून मी 'खामोशी' हा चित्रपट केला असल्याचे अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी सांगितले.
पुढे बोलताना अभिनेत्री सीमा बिस्वास म्हणाल्या, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मी कायम सांगत आले आहे की, आपण कोणतीही भूमिका करीत असताना आपली भूमिका प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. आपण चित्रपटातील भूमिकांमधून प्रेरणा घ्यायला पाहिजे, त्यांना आपण कॉपी केले नाही पाहिजे. कॉपी केल्यामुळे मूळ भूमिकेतील आत्मा नष्ट होतो. आपण भूमिका करण्याच्या प्रक्रियेतून जात असताना त्या संबंधित भूमिकेला न्याय देत ती भूमिका जगली पाहिजे. मी आजपर्यंत ज्या भूमिका केल्या त्या प्रत्येक भूमिकेत स्वत: ला पूर्णपणे गुंतवून ठेवत २४ तास संबंधित भूमिकेचे जीवन जगत मी चित्रपट केले. विशेषत: प्रत्येक काम करत असताना मी शून्यापासून सुरू करत असते.