Published on
:
18 Jan 2025, 7:23 am
Updated on
:
18 Jan 2025, 7:23 am
पुढारी ऑनलाइन डेस्क | राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबिर आजपासून शिर्डी येथे सुरु झाले. या शिबिराला छगन भुजबळ हे नाराज असल्याने उपस्थित राहणार नाहीत अशी चर्चा कालपर्यंत होती. मात्र, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी आज शिर्डीत दाखल झाले. त्यामुळे आपली नाराजी दूर झाल्याने आपण आलात का असे माध्यम प्रतिनिंधीनी विचारले असता भुजबळांनी नाराजी वैगेरे दूर झाल्याचा प्रश्न येत नाही, आपल्या विनंती करण्यात आली म्हणून आलो असल्याचे स्पष्ट केले.
छगन भुजबळ हे आज (दि.18) राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी शिर्डीत दाखल झाले. दरम्यान माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, काल प्रफुल्ल पटेल साहेब माझ्याकडे दोन तास येऊन बसले होते. त्यांनी आपण या म्हणून विनंती केली. तटकरे यांचाही फोन आला होता, आपण कृपा करुन थोड्या वेळ का होईना या म्हणून त्यांनीही विनंती केली. त्यामुळे मी थोडा वेळासाठी आलो आहे, त्यानिमित्ताने साईबाबांचे दर्शनही होईल. आपण पूर्ण वेळ थांबणार आहात का म्हणून विचारले असता, तब्येत बरी नाही त्यामुळे पूर्णवेळ थांबता येणार नाही असे भुजबळांनी सांगितले.
यावेळी छगन भुजबळ यांनी अजित पवारांचा उल्लेख कोणताही उल्लेख केला नाही. केवळ प्रफुल्ल पटेल व सुनिल तटकरे यांचा फोन आल्याने आपण त्यांच्या विनंतीला मान देण्यासाठी आल्याचे भुजबळांनी सांगितले. त्यामुळे थोडावेळ का होईना पण, भुजबळांच्या नाराजीनंतर अजित पवार छगन भुजबळ पहिल्यांदा समोरासमोर येणार आहेत.
मंत्रिमंडळात डावल्यानंतर महायुतीचे नागपूरातील अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकमध्ये निघून आले होते. त्यानंतर त्यांनी पक्षातील अनेक कार्यक्रमांना जाणे टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतही भुजबळ गेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आजच्या शिबीराला भुजबळ उपस्थित राहतील किंवा नाही याबाबत पक्षातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून होते.
दरम्यान छगन भुजबळ यांची प्रकृती बरी नसल्याने ते हजर राहणार नाहीत अशी माहिती देण्यात आली होती. त्यावर पत्रकारांनी विचारले असता, आपली प्रकृती बरी नसल्यानेच मी कोट वैगेरे घालून आलो आहे व त्यामुळेच पूर्णवेळ मला थांबताही येणार नसल्याचे यावेळी भुजबळांनी स्पष्ट केलं.