सोलापूर : निवडणूक नायब तहसीलदारांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास नूतन मराठी विद्यालय येथील निवडणूक साहित्य वाटपाच्या ठिकाणी घडली.
याप्रकरणी सुधाकर तुकाराम बंडगर (वय 50, रा. नेमणूक निवडणूक नायब तहसीलदार, रा. मंत्री चंडक रेसिडेन्सी, विजापूर रोड) यांच्या फिर्यादीवरून शिवाजी दिगंबर उबाळे (वय 57, रा. नेम. कै. अण्णासाहेब साठे प्रशाला यांची केंद्राध्यक्ष रा. मु. पो खंडाळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर), चिकमाने अनिल व्हनप्पा (वय 52, महासिद्ध विद्यालय डोणज यांची केंद्राध्यक्ष रा. मु. पो. संभाजी नगर, मंगळवेढा), धुमाळ नागनाथ लिंगा (वय 57, नेम. विद्यानिकेतन प्रशाला सोलापूर यांची एफ. पी. ओ 1 रा. मु. पो. वाळूज, ता. मोहोळ), अमोल विठ्ठल डेंगळे, (वय 47, रा. कवठेकर प्रशाला पंढरपूर) यांची एफ. पी. ओ-1 (रा. कुर्डूवाडी, ता. माढा), अशोक बंडप्पा पाटील, (वय 55, ने. झेडपी पी. एम. स्कूल कोंडी यांची ओ. पी. ओ-1 (रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नूतन मराठी विद्यालय सोलापूर येथे निवडणूक साहित्य वाटपावेळी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या कामकाजासाठी वरील संशयित आरोपी यांची नेमणूक करण्यात आली असता, बदली कर्मचारी म्हणून मतदान केंद्रावर पाठवण्यासाठी वारंवार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी लाऊड स्पीकरवर त्यांच्या नावाची घोषणा केली. तरीदेखील वरील कर्मचारी हे पात्र सर्व पोलिंग पार्टीवर गेल्यानंतर व मतदान पेट्यांचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर सव्वादोन वाजण्याच्या सुमारास उपस्थित होऊन आम्ही येथेच होतो. मतदान प्रक्रियेतील नियुक्तीचे ठिकाणी देण्यात आलेली कर्तव्य पार पाडण्याकरिता जाणार नसल्याबाबत सांगून तहसीलदार यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे साहित्य वाटप प्रक्रियेच्या दरम्यान अडचणी व अडथळा निर्माण करून कर्तव्य पार पाडण्यात टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार जाधव हे करीत आहेत.