हॉट सीट कर्जत-जामखेड मतदारसंघ:भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र या मुद्द्यावरच प्रचार केंद्रित
2 hours ago
1
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडच्या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे एकमेकांविरुद्ध रिंगणात आहेत. सामान्य मतदारांच्या पाणी, रस्ते, वीज, रोजगार, शेती उत्पादनाला बाजारपेठ आदी समस्या बाजूलाच पडत भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. गेल्या वेळी महायुतीच्या नेत्यांनी बारामतीचे पार्सल परत पाठवा असे म्हटले होते. पाच वर्षांनंतरही याच मुद्द्यावर भर दिला जात आहे. दुसरीकडे, शिंदे यांनी निवडणूक लढवण्यासाठी जनतेकडून आर्थिक पाठबळाचे आवाहन केल्याने रोहित पवार यांनीही त्यांच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडत त्यांच्यावर टीका केली आहे. मतदारसंघातील उमेदवार असेल तरच शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊ शकते, असे राम शिंदे म्हणत आहेत. आपला तो आपलाच भूमिपुत्र असा प्रचार केला जात आहे. पाच वर्षांत आ. रोहित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय जमिनी लाटण्याचे काम केले. सर्व शासकीय इमारतींचे ठेकेदार बारामतीचे सर्व पीए बारामतीचे, विकास कमी जाहिरातबाजी जास्त केली जात आहे. आपण केलेल्या कामांचे श्रेय केले जात असल्याने बारामतीवाले नकाे, अशी भूमिका शिंदे मांडत आहेत. तर सत्ता असताना शिंदेंनी सर्वसामान्यांसाठी काहीच केले नसल्याचा आरोप पवारांकडून केला जातो. कोरोना काळात अनेक शासकीय इमारती बांधल्या. त्या वेळी आ. राम शिंदे घरी बसल्याचा आरोपही ते करत आहेत.
२०१९ च्या प्रचारात जामखेड तालुक्याला दिलेले कुकडी कालव्याचे पाण्याचे आश्वासन पूर्ण झालेले नाही. कर्जत तालुक्यात एमआयडीसी सुरू होण्यापूर्वीच जागेच्या वादावरून ती रखडली. आधी रोहित पवारांनी चापडगावजवळील पाटेगाव येथे एमआयडीसी उभारणीची घोषणा केली. पण राम शिंदे यांनी त्यांची ताकद वापरून कुंबळी येथील जागेवर मंजुरी मिळवल्याने एमआयडीसी वादात अडकली. कर्जत-जामखेडला १९९५, १९९९, व २००४ पर्यंत भाजपकडून सदाशिव लोखंडे, २००९ मध्ये आ.राम शिंदे विजयी झाले. २०१४ मध्ये तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली आणि यातही आ. शिंदेंना मतदारसंघ ताब्यात ठेवता आला. २०१९ मध्ये मात्र रोहित पवार यांनी एंट्री घेत आ.राम शिंदे यांचा पराभव केला. आता दुसऱ्यांदा दोघे आमनेसामने आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)