राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणा आणि पैशांचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीसविनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. या घटनेवर निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. वसई विरार परिसरातील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे यांच्या हॉटेलच्या खोलीत सुमारे 10 लाख रुपये सापडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तावडे यांच्या हॉटेलमधील रूममधून 9.93 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.