इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर हिजबुल्लाहने हल्ला केला. नेतन्याहू यांच्या कैसरा येथील घराजवळ शनिवारी दोन रॉकेट डागण्यात आले. हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंब घरी नव्हते. ही घटना गंभीर असल्याचा उल्लेख करत हल्ल्याबाबत तपास सुरू असल्याचे पोलीस आणि शिन बेट अंतर्गत सुरक्षा एजन्सीने सांगितले
इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी X वर पोस्ट करत घटनेचा निषेध केला आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रात हिंसाचार वाढल्याबद्दल इशारा दिला आहे. आपण शिन बेटच्या प्रमुखाशी बोललो असून, त्वरीत घटनेचा तपास करण्याची आणि जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे हर्झोग यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
इस्त्रायलमधील विरोधी पक्षानेही हल्ल्याचा निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते यायर लॅपिड आणि राष्ट्रीय एकता अध्यक्ष बेनी गँट्झ यांनी या घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
याआधीही 19 ऑक्टोबर रोजी नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल्लाहने घेतली होती. नेतान्याहू यांनी हिजबुल्लाहवर त्यांची आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.