शिवसेना ही चार अक्षरे आमच्यासाठी पंचप्राण आहेत. काल, आज आणि उद्याही माझी निष्ठा मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीच आहे. त्यामुळे मी नाराज असल्याचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्यामागे शिंदे गटाचे षडयंत्र आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या या स्टंटबाजीचा काहीएक उपयोग होणार नाही. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचेच उमेदवार विजयी होतील, असे उपनेते विजय साळवी यांनी मिंधेंना ठणकावून सांगितले.
खोक्यांसाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. भाजपसोबत त्यांनी सरकार बनवले. सत्तेसाठी आणि खोक्यांसाठी लाचारी पत्करून काही आमदार, खासदार आणि पदाधिकारी मिंधेवासी झाले. निष्ठावंत शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठाम राहिले. विजय साळवी यांनाही अनेक प्रलोभने दाखवण्यात आली. मात्र ते मिंधे गटात गेले नाहीत. त्यामुळे त्यांना त्रास देण्यासाठी खोटय़ा केसेस, तडिपारी अशी भीती दाखवण्यात आली. मात्र मातोश्री हाच आमचा श्वास असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱयांना घाम फोडला. तब्येतीच्या कारणास्तव काही दिवस विजय साळवी उपचार घेत होते. मात्र शिंदे गटाकडून चुकीच्या पद्धतीने याचे भांडवल करत विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून विजय साळवी नाराज असल्याचे व्हिडीओ मुद्दामहून फिरवले जात आहेत. कोरोना काळात विजय साळवी आजारी असताना एकनाथ शिंदे त्यांना भेटायला रुग्णालयात गेले असे उल्लेख असलेले व्हिडीओ जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विजय साळवी यांनी मिंधे गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे. निष्ठावंत शिवसैनिक कधीच नाराज नसतो. फेक नरेटिव्ह मिंधे गटालाच भारी पडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पोकळ सहानुभूती मिंधेंना महागात पडेल
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पक्षात व सत्तेत सर्वात उच्च पदे दिली होती, मानसन्मान दिला तरीही शिंदे यांना ईडीची भीती होती. अटक होईल म्हणून त्यांना भाजपबरोबर युती हवी होती, परंतु उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ते मान्य नाही केले. म्हणूनच त्यांनी बंड केले. त्यामुळे पोकळ सहानुभूती दाखवून शिंदे गट मतदारांवर प्रभाव पाडू शकत नाही, असे विजय साळवी यांनी ठणकावले. कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, अंबरनाथ येथे मशालच निवडून येणार, असा ठाम विश्वासही साळवी यांनी व्यक्त केला.