मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याने येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. (Image source- X)
Published on
:
17 Nov 2024, 4:50 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:50 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याने येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. सर्व सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर मणिपूरमध्ये तणाव वाढला. आंदोलकांनी ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यांच्या निवासस्थानांची तोडफोड केली असून काहींना आगी लावल्या. संतप्त जमावाने मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे इंफाळच्या विविध भागात जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
मंत्री, आमदारांची घरे पेटवून दिली
आंदोलकांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या जावयांच्या निवासस्थानासह तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांची तोडफोड केली. त्यांच्या मालमत्तांना आग लावली. विशेषत: जिरीबाममध्ये हिंसाचार उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा निलंबित केली आहे.