18, 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी नाही, शाळा नियमितपणे सुरुच राहणार आहेत. file
Published on
:
17 Nov 2024, 4:48 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:48 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती झाल्याने शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नाही केवळ अशाच शाळांना स्थानिक पातळीवर सुटी देण्याबाबतचा निर्णय मुख्याध्यापक घेतील. याव्यतिरिक्त इतर सर्व शाळा नियमितपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश प्राथमिक शिक्षण विभागाचे आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे.
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दि. 18, 19 नोव्हेंबरला शाळांना सुटी असल्याचा संभ्रम निर्माण झाल्याने शाळेला सुटी आहे किंवा नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली होती. मतदानप्रकियेच्या कामकाजासाठी शिक्षक़ांची नियुक्ती करण्यात आल्याने शाळांना सुटी असल्याचा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये पसरला होता. मात्र याबाबतीत प्राथमिक शिक्षक आयुक्तांनीच खुलासा केला असून, ज्या शाळांमधील शिक्षकांकडे निवडणुकीचे कामकाज नाही, त्या शाळा नियमितपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.
21 नोव्हेंबरला सुटी देण्याची मागणी
येत्या 20 नोव्हेंबरला मतदान असल्याने 19 नोव्हेंबरलाच मतदानाचे सर्व साहित्य घेऊन शिक्षकांना मतदान केंद्रात हजर राहावे लागणार आहे. 20 नोव्हेंबरला सकाळी 6 पासून रात्री उशिरापर्यंत वोटिंग मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन स्ट्राँगरूममध्ये पोहोचविल्यानंतरच शिक्षकांची सुटका होणार आहे. या सर्व प्रक्रियेला मध्यरात्रदेखील उजाडू शकते. त्यामुळे 21 तारखेला सुटी मिळावी अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.