प्रयोगानुभव – समृद्धतेचा  हळुवार स्पर्श

4 hours ago 2

>> पराग खोत

आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या आणि मनात घर करून राहिलेल्या एखाद्या सुखद आठवणीचं जतन करून त्याचा आविष्कार कुठल्याही कला प्रकारातून करता येऊ शकतो का? मग तो शब्दांतून असेल किंवा चित्रांतून किंवा मग संगीतातून? ते प्रकटीकरण त्या आठवणीपेक्षा कैकपटींनी समृद्ध अनुभव देऊ शकतं का? ‘प्रिय भाई – एक कविता हवी आहे’ हे याचं ठळक आणि आश्वासक असं होकारार्थी उत्तर आहे.

कुठलीही कलाकृती निर्माण होण्याआधी छोटीशी का होईना एक कल्पना असावी लागते. नाटकाच्या भाषेत याला ‘जर्म’ (उास्) असं म्हणतात. हा जर्म नंतर हळूहळू फुलवत नेऊन त्याचा पूर्ण लांबीचा प्रयोग तयार होतो. मुळात तो अनुभव जितका सकस असेल तितकाच त्याचा आविष्कार प्रगल्भ असतो आणि त्यातला निस्वार्थ प्रामाणिकपणा समोरच्याला भावतो. डॉ. समीर कुलकर्णींना 1998 साली आलेल्या एका छोटय़ाशा अनुभवाने त्यांचं भावविश्व समृद्ध केलं. काही वर्षांनंतर त्यांनी ‘अनुभव’ या मासिकात लेख लिहून ते शब्दांत मांडलं आणि त्याही पुढे जाऊन इतक्या वर्षांनंतर त्यांनी त्याची रंगावृत्ती तयार करून ते रसिकांसमोर आणलंय. ‘प्रिय भाई – एक कविता हवी आहे’ हे त्याचं नाव. रुढार्थाने हे नाटक नाही. हा एक प्रयोग आहे आपल्या मनाच्या समृद्धतेत समोरच्या व्यक्तीला सामील करून घेण्याचा आणि तो अनुभव तितक्याच उत्कटतेने त्याच्याही भावविश्वात रुजविण्याचा. या प्रयोगात समोर बसलेला प्रेक्षक जितका संवेदनशील आणि ग्रहणक्षम असेल, तितका तो अधिक समृद्ध होत जातो.

‘प्रिय भाई’ हे नेमकं काय आहे (आणि काय नाही?) हे सांगणं आवश्यक आहे. कारण ते सादरीकरणाच्या कुठल्याही ठरावीक साच्यात बसत नाही. तो अनुभवायचा एक कोलाज आहे आणि तो मांडताना लेखन, अभिनय, चित्रकला आणि संगीत अशा विविध कलांची त्याला जोड मिळाली आहे. ते अभिवाचन नाही, तो सांगीतिक कार्यक्रम नाही आणि नाटक तर नाहीच नाही. पात्रांच्या संवादांतून आणि भावदर्शनातून उलगडत जाणारा तो आठवणींचा एक कोष आहे. अनुभवांची दौत कलंडून त्यातली आठवणींची शाई सांडावी आणि आपल्या मनाच्या टिपकागदाने जमेल तेवढी शाई शोषून घेऊन आपणही त्यात रंगून जावं असा काहीसा हा प्रकार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या बद्दलच्या या आठवणी आहेत ती महाराष्ट्राची दैवतं आहेत आणि म्हणूनच हे ‘या हृदयीचे त्या हृदयी’ इतक्या अलवारपणे होऊ शकतं.

डॉ. समीर कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रख्यात डॉक्टर. आपल्या डॉक्टरी पेशासोबतच साहित्याची आवड म्हणून वॉल मॅगझिन तयार करून आपली हौस पूर्ण करणारे. अशातच 1998 सालच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘स्वातंत्र्य म्हणजे काय?’ या विषयावर भित्तीपत्रक तयार करण्याचं ते आणि त्यांची टीम ठरवतात. त्यासाठी साहित्याची जमवाजमव होते आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची याच विषयावरची एक कविता कुठे मिळतेय का, याचा शोध सुरू होतो. त्या कवितेचा इंग्रजी अनुवाद त्यांच्याकडे असला तरी ती मूळ बंगाली कविता आणि तीसुद्धा गुरुदेवांच्या हस्ताक्षरातील मिळाली तर तो मणिकांचन योग ठरेल असं त्यांना वाटतं व मग सुरू होतो शोध  कवितेचा. अनेक ठिकाणी निष्फळ प्रयत्न करून झाल्यानंतर त्यांना एक नाव सुचतं ते म्हणजे पु. ल. देशपांडे यांचं. पुलंचं बंगाली प्रेम आणि शांतिनिकेतनशी असलेला घनिष्ठ संबंध सर्वश्रुत आहेच. त्यातच पुलं राहत असलेल्या इमारतीतच डॉ. कुलकर्णी यांची मैत्रीण राहत असल्याने त्यांचा पुलं आणि पर्यायाने सुनीताबाई यांच्याशी संपर्क सुकर होतो व त्यानंतर सुरू होतो तो प्रवास त्या कवितेच्या शोधाचा. त्या प्रवासातल्या तरल अनुभवांच्या नोंदी म्हणजेच ‘प्रिय भाई.’ हा प्रवास केवळ डॉ. कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचा नसून खुद्द पुलं आणि सुनीताबाई यांचाही आहे. कुणीतरी एक कविता मागावी आणि ती शोधत असताना आठवणींची पाने उलटत जाऊन आयुष्याचीच पुन्हा सुरेल कविता व्हावी असा हृद्य अनुभव पुलं आणि सुनीताबाईंना येतो व तोच या प्रयोगातून आपल्यासमोर जसाच्या तसा मांडला जातो. मराठी माणसाच्या मनात देवपदाला पोहोचलेल्या या माणसांचा निगर्वी साधेपणा आणि कवितेविषयीची आस्था आपल्याला दिसून येते व आपण हळवे होत जातो. ती कविता शोधत असताना नकळतपणे उलटली गेलेल्या त्या उभयतांच्या आयुष्यातल्या आठवणींच्या मखमली पानांबद्दल सुनीताबाईंच्या तोंडून ऐकताना मन गहिवरून येतं.

डॉ. समीर कुलकर्णी यांच्या रंगावृत्तीला अमित वझे यांनी मुक्ताविष्काराच्या स्वरूपात, पण नेमकेपणाने मांडलंय. स्वत अमित वझे डॉ. समीर कुलकर्णींच्या आणि मानसी वझे त्यांच्या मैत्रिणीच्या धनश्रीच्या भूमिकेतून संवाद साधत हे नाटय़ उलगडतात. त्यांना जयदीप वैद्य, अंजली मराठे आणि निनाद सोलापूरकर हे तिघे डॉक्टरांची टीम म्हणून व गायन-वादनाची उत्तम साथ देतात. हा सगळा संवाद ज्यांच्याशी होतो त्या सुनीताबाई देशपांडे आपल्या समोर प्रत्यक्ष बसलेल्या आहेत आणि त्यांच्या साथीने ही कवितेच्या शोधाची गोष्ट मांडली जाते. ती प्रभावी करण्याचं सर्वात मोठं श्रेय द्यायला हवं ते मुक्ता बर्वे यांना. त्यांच्या आवाजातून, देहबोलीतून आणि अभिनयातून त्या साक्षात सुनीताबाई आपल्यासमोर सादर करतात. त्याचं कवितेविषयीचं प्रेम, त्यांचा हळवेपणा, त्यांची साहित्यिक जाण, त्यांचं भाईंसोबतचं प्रगल्भ नातं, त्यांचा करारीपणा हे सगळं समर्थपणे उभं करणं हे मोठं आव्हान होतं आणि ते मुक्ता बर्वे यांनी अचूकपणे पेललं आहे. कुठलीही हालचाल न करता एका जागी बसून केवळ भावदर्शन आणि आवाजातील चढउताराच्या सहाय्याने नाट्य उभं करणं हे त्यांनी सहजी करून दाखवलं आहे.

या प्रयोगातील सर्व कलावंत आणि सहाय्यक यांच्या मेहनतीला जोड देऊन प्रयोग अजून चमकदार करणारी आणि प्रसंगानुसार मागच्या पडद्यावर दिसणारी चित्रे अप्रतिम. ती साकार करणाऱ्या मिलिंद मुळीक यांचं विशेष कौतुक करायला हवं इतकी ती यथार्थ आहेत. पुलं, सुनीताबाई यांविषयीचा प्रेमादर, कवितेविषयीची आस्था आणि संवेदनशील मन असणाऱया प्रत्येकाने न चुकता पाहायलाच हवा असा हा आगळावेगळा प्रयोग आहे.

[email protected]

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article