महाराष्ट्र राज्यातील सरकार हे भाजपने चोरलेले सरकार आहे. ते जनतेने निवडून दिलेले सरकार नाहीय, असा सणसणीत टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजप महायुतीला लगावला. ते मुंबईत बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बनलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे महाविकास आघाडीचे सरकार हे खऱया अर्थाने जनतेचे सरकार होते, असेही ते यावेळी म्हणाले.
भाजपच्या नेत्यांनी पैशांच्या जोरावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले, तशाच प्रकारे झारखंडमध्येही सरकार पाडण्याचे मोठे प्रयत्न भाजपने केले. आदिवासी असूनही विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवले. त्यासाठी काही ठोस कारणही नव्हते. त्यांना अटक का केली? असे म्हणत न्यायालयाने जामीन देताना तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले, असे दिग्विजय सिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’च्या घोषणाचाही दिग्विजय सिंह यांनी समाचार घेतला. पंतप्रधान म्हणतात ‘एक है तो सेफ है’ पंतप्रधानांच्या या घोषणेला राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी काही जणांचे फोटो दाखवलेत. जे देशाच्या अर्थव्यवस्थेत अशी मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.