>> देवेंद्र भोगले
शिवडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेची स्थापनाच मुळी या मतदारसंघात झाली. त्यामुळे इथे दगडालाही शेंदूर फासून निवडणुकीला उभे केले तरी शिवसेनेची मते इकडची तिकडे जाणार नाहीत अशी ख्याती आजही सांगितली जाते. पिढय़ा बदलल्या, परिस्थिती बदलली, पण शिवसेना एके शिवसेना हे शिवडीतील समीकरण मधला एक पाच वर्षांचा काळ सोडला तर कधीही बदलले नाही आणि यंदाच्या निवडणुकीतही शिवडीत शिवसेनेसाठी मतांचे समीकरण बेरजेचेच असेल यात वाद नाही.
शिवडी हा दक्षिण मुंबईत शिवसेनेसाठी एक महत्त्वाचा मतदारसंघ. यंदा या मतदारसंघातील विद्यमान आमदार अजय चौधरी हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तिसऱयांदा निवडणूक रिंगणात आहेत. लालबाग, परळ, भोईवाडा, शिवडी, काळाचौकी, चिंचपोकळी, करीरोड, एन. एम. जोशी मार्ग आणि प्रभादेवी असा गिरणगावात हा मतदारसंघ पसरला आहे. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणी कामगारांचा संप, शिवसेनेचे प्रत्येक महत्त्वाचे आंदोलन या मतदारसंघातील मतदारांनी पाहिले आणि अनुभवले आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुंबई, महाराष्ट्रासाठी असलेले महत्त्व आजही येथील आबालवृद्धांना माहीत आहे. हाच मतदार शिवसेनेचा हक्काचा मतदार आहे.
आजही शिवडी विधानसभा मतदारसंघात जुन्या इमारतींमध्ये राहणारी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या पिढीला पूर्वीचा धनुष्यबाण अजूनही आठवत असला तरी आताची मशालही त्यांच्या मनात कोरली गेली आहे. शिवसेनेशी गद्दारी म्हणजे मुंबई, महाराष्ट्राशी गद्दारी अशी त्यांची प्रबळ भावना ही शिवसेनेची जमेची बाजू आहे आणि विजयाची निश्चिती देणारी आहे.
जुन्या इमारतींचा प्रश्न हा शिवडीतील महत्त्वाचा मुद्दा. जुन्या इमारतींची दुरुस्ती व्हावी, पुनर्विकास व्हावा यासाठी म्हाडाच्या माध्यमातून शिवसेनेने शिवडी मतदारसंघात केलेले काम वाखाणण्यासारखे आहे. 500 फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर शिवसेनेमुळे माफ झाला. आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 700 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून माफी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे अजय चौधरी यांचे लक्ष्य आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील जुन्या इमारतींचा रखडलेला विकास केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मार्गस्थ करण्यासाठी दक्षिण मुंबईतील शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या सहकार्याने अजय चौधरी सक्रिय आहेत. शिवडीतील जुन्या इमारतींचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
शिवसेनेची एकगठ्ठा मते आणि महाविकास आघाडी म्हणून मुस्लिम मतदार, दलित मतदार, महिला मतदार यांच्या जोरदार पाठिंब्यामुळे इथे शिवसेनेचे पारडे जड आहे. तरुण पिढीला आकर्षित करण्याचा मनसे आणि काही अपक्षांचा प्रयत्न दिसून येतो, पण प्रत्यक्ष मते मिळवण्यासाठी तो यशस्वी ठरेल असे दिसत नाही. अजय चौधरी आणि शिवसैनिकांनी पदयात्रा, चौकसभा व प्रचाराच्या अन्य माध्यमांतून आतापर्यंत संपूर्ण मतदारसंघ कव्हर केला आहे. शिवडीत मशाल धगधगली आहे आणि अजय चौधरी हॅट्ट्रिक करणार अशी मतदारांनी मनाशी खूणगाठ बांधली आहे.