कडक पांढरा सदरा हवा, कार्यकर्त्यांची मागणी:उमेदवारांपेक्षा कमी नाही म्हणत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खादीला मागणी वाढली
2 hours ago
1
विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत असून नेते, उमेदवार, कार्यकर्ते अशा सर्वांनाच रॅली, सभांमध्ये रंग जमवण्यासाठी खादीचा पांढरा सदरा, पायजमा हवा आहे. स्वदेशी तसेच स्वच्छ छवीचे प्रतीक म्हणून खादीचा कडक सदरा, पायजामा, पायात साधी चप्पल किंवा काळे जोडे, डोक्यावर पांढरी टोपी अशा नेत्यांच्या अवतारात सर्वच वावरताना दिसत आहेत. सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या रॅली निघणार आहेत. या रॅलीत रंग जमवण्यासाठी नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांकडून पांढरा सदरा, पायजाम्याला मागणी वाढल्याची माहिती विक्रेत्यांद्वारे देण्यात आली. शहरात खादीचे पोशाख विक्रेते मोजकेच आहेत. त्यांच्याकडून कोणी पांढरा कडक शर्ट तर कोणी पांढऱ्या सदऱ्यासह पायजम्यावर खुलून दिसणारे जॅकेट खरेदी करत आहेत. आता तर केवळ एकच दिवस शिल्लक असला तरी मतमोजणी होत नाही, तोवर आपणही उमेदवारापेक्षा कमी नाही, अशा अविर्भावात कार्यकर्ते वावरणार आहेत. उमेदवारांच्या अंगात पांढरा सदरा हमखास दिसून येत आहे. त्याखाली काळी पॅण्ट किंवा निळी जिन्स घालत आहेत. काही उमेदवार व कार्यकर्ते संपूर्ण सदरा, पायजमा असा पोशाख घालताहेत. उमेदवारांसह कार्यकर्तेही त्यांची हौस भागवून घेताहेत. पांढरा सदरा हा कोणत्याही समारंभात कामी येतो. निवडणूक आटोपली तरीही तो वापरता येतो. अगदी स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिनासह राष्ट्रीय उत्सव प्रसंगी ते कामी येतात. त्यामुळे सध्या जेथून मिळेल त्या दुकानातून पांढरा सदरा, पायजमा खरेदी केला जात आहे. तो कडक असावा, याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. कारण, खादीचा सदरा एकदा धुतल्यानंतर काहीसा सैल पडतो. तो कडक ठेवण्यासाठी स्वच्छ धुतल्यानंतर आरारोटच्या द्रावणात भिजवून त्यावर इस्त्री केली जाते. यामुळे इस्त्री करणाऱ्यांकडे सध्या पांढऱ्या सदऱ्यांची संख्या वाढली आहे. पांढरा पोशाख जेवढा कडक असेल तेवढा उठून दिसतो. त्यामुळे इस्त्री करणारे, लाँड्री व्यावसायिकांनाही सध्या रोजगार मिळत आहे. तसेच अमूक वेळात तयार ठेवा असे त्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे जर कमी वेळात पोशाख कडक व इस्त्री करून हवा असेल तर दरही वाढवून घेतले जात आहेत. निवडणुकीमुळे सध्या जॅकेटही खात आहे भाव सध्या खादीच्या कडक सदऱ्यासह, पायजाम्याला मागणी वाढली असताना युवा कार्यकर्त्यांकडून जॅकेट घालण्याचेही चलन वाढल्यामुळे सध्या हे जॅकेटही भाव खाऊन जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच खादीच्या पोशाखांना सुगीचे दिवस आलेत. खादीच्या पांढऱ्या पोशाखांना मागणी वाढणार याची जाण असल्याने आधीपासूनच आम्ही विविध आकाराचे सदरे, पायजमे मागवून ठेवले होते, अशी माहिती विक्रेता महेश यांनी दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)