Maharashtra Assembly Polls | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दै. ‘पुढारी’ला विशेष मुलाखत.File Photo
Published on
:
18 Nov 2024, 4:20 am
Updated on
:
18 Nov 2024, 4:20 am
मुंबई : विवेक गिरधारी/चंदन शिरवाळे
लोकसभेच्या प्रचारात चाललेले विरोधकांचे खोटे मुखवटे आता गळून पडले आहेत. महाराष्ट्राचे वारे या विधानसभेला बदलले असून, ते आता महायुतीच्या बाजूने वाहू लागले आहेत. महाराष्ट्रात आज मौसम महायुतीचाच आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवत एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपल्याबद्दलचे सारे अंदाज खोटे ठरवण्याचा सिलसिला त्यांनी कायम ठेवला तो तेव्हापासून! शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते असूनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सर्वाधिक विश्वास आज मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरच आहे आणि “मुख्यमंत्री म्हणून माझाही विश्वास भाजप श्रेष्ठींवर आहे,” अशा शब्दांत हे प्रेम एकतर्फी नसल्याचे एकनाथ शिंदे सूचित करतात. तरीही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत ते कुठेही आपले नाव आणत नाहीत. मी मुख्यमंत्री आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आम्ही टीमने काम करतो, असे ते अत्यंत विनम्रपणे सांगतात.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पायाला भिंगरी लावल्यागत महाराष्ट्राचे दौरे सुरू असताना मुख्यमंत्री शिंदे यांना गाठणे ही किती अशक्य गोष्ट आहे, याची कल्पना इतरजणांना येण्याचे कारण नाही. दिवसाला किमान सहा ते आठ सभा आणि शिवाय माध्यमांना मुलाखती देणे सुरू असताना, ‘वर्षा बंगला ते महालक्ष्मी रेसकोर्सवर’चे हेलिपॅड अशा पंधरा मिनिटांच्या सहप्रवासात मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाला दिलेली ही दिलखुलास मुलाखत -
महाराष्ट्राने फिदा व्हावे आणि तुम्हाला पुन्हा सत्ता द्यावी, असे आपल्या महायुती सरकारचे कोणते निवडक निर्णय आपण सांगू शकाल?
- निर्णय असे एक-दोन नाहीत. महाविकास आघाडीच्या राजवटीत घसरलेली महाराष्ट्राची गाडी एका मजबूत मार्गावर पुन्हा आणण्यासाठी आम्ही गेल्या दोन-अडीच वर्षांत निर्णयांची मालिकाच चालवली म्हणा! त्यातही महाविकास आघाडीच्या स्थगिती सरकारने मुंबईचा मेट्रो प्रकल्प थांबून टाकला होता. बुलेट ट्रेन प्रकल्पही रोखला होता, आरे कार शेड, समृद्धी महामार्ग, ग्रामीण भागासाठी संजीवनी ठरणारी जलशिवार योजना, आपल्या पालघर जिल्ह्याला जगाच्या नकाशावर नेणारे वाढवण बंदर असे सारे प्रकल्प ठप्प करून टाकले होते. सर्वात मोठा सागरी सेतू ठरलेला अटल सेतूही या लोकांनी रोखूनच धरला होता. यातला एकूण एक प्रकल्प आम्ही आधी ट्रॅकवर आणला. प्रत्येक प्रकल्पाला महायुती सरकारने आपली गती दिली. काही प्रकल्पांचा विस्तार केला. उदाहरण द्यायचे तर वाढवण बंदर हे जगातील महाकाय बंदरांपैकी एक असेल. या बंदराचा वापर करण्यासाठी पालघरला विमानतळ उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला. नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ वर्षभरात सुरूदेखील होईल. या सर्व प्रकल्पांतून आपल्या लाखो भूमिपुत्रांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे आपण महाराष्ट्रात निर्माण करत आहोत. ते पूर्ण होईल तेव्हा महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्यात कुठूनही फार फार तर सहा तासांत पोहोचता येईल. ही कल्पना आपण करू शकतो. कारण, महाराष्ट्राचे सारे विकास प्रकल्प आम्ही स्थगिती सरकारच्या साखळदंडातून मुक्त केले आहेत. आज गतिमान झालेल्या महाराष्ट्राला आता कुणीही रोखू शकत नाही.
जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणारचा तेल शुद्धीकरण प्रकल्पही आधीच्या महाविकास आघाडी सरकारने रोखला! हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्राच्या आणि खासकरून कोकणच्या विकासाला बूस्टर डोस देणारे ठरू शकतात. हे दोन्ही प्रकल्प पुन्हा रुळावर आणण्यासाठी आपल्या सरकारने काय केले?
- कोकणातील हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत; पण महाविकासवाल्यांनी रखडवलेले बाकी प्रकल्प वेगळे आणि कोकणातील हे दोन प्रस्तावित प्रकल्प वेगळे. वर सांगितले त्या प्रकल्पांना लोकांचा विरोध नव्हता. उलट लोकांना ते सर्व प्रकल्प हवे होते. महाविकास आघाडी सरकारला ते नको होते म्हणून त्यांनी ते सर्व प्रकल्प स्थगित केले होते. या सरकारी स्थगितीच्या बेड्या आम्ही तोडल्या म्हणून अटल सेतू, मेट्रो हे प्रकल्प आज पूर्णत्वाला पोहोचत आहेत. कोकणच्या दोन्ही प्रकल्पांबद्दल, मग जैतापूर असो की नाणार, कोकणच्याच मनात एक संशय आहे. आमचे सरकार लोकांना सोबत घेऊन काम करते. आम्ही लोकांच्या विरोधात नसतो. आमचे जनस्नेही सरकार आहे. जैतापूर आणि नाणारबद्दल आमची स्थानिक जनतेशी सतत चर्चा सुरू आहे. त्यातून जनमत प्रकल्पांच्या बाजूने उभे राहिले की, हे दोन्ही प्रकल्पही मार्गस्थ होतील.
गेल्या अडीच वर्षांत राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी लोक महायुती सरकारला निवडून देतील, असे आपल्याला ठामपणे वाटते; पण महायुतीचे मुख्यमंत्रिपद कुणाला हे ठरलेले दिसत नाही. या निवडणुकीत महायुतीचा मुख्य चेहरा आपण आहात; पण मग तसे जाहीर करण्यात काय अडचण होती? प्रचाराचा मोठा भार तर तुमच्यावरच दिसतो!
- हो, आता वेळ कमी आहे म्हटल्यावर सगळीकडे, आमच्या आमदारांच्या मतदारसंघांत जायलाच हवे; पण आमचे नेतेही सगळीकडे जात आहेत. देवेंद्रजी, अजितदादा असे आम्ही सगळीकडेच प्रचार करत आहोत, लोकांपर्यंत जात आहोत. आता सगळीकडे सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांत तर जाणे शक्य होत नाही; पण शक्य होईल तेवढे दौरे मी करतोय. देवेंद्रजी करतात, अजितदादाही करताहेत. शेवटी हे कुणा एकाचे काम नाही. आम्ही टीमने काम करतोय आणि आमची टीम मजबूत आहे.
मध्यंतरी तुम्ही असे म्हणालात की महाराष्ट्राचे वारे आता फिरले आहे आणि ते महायुतीच्या बाजूने वाहते आहे. राजकीय मौसम बदलला, असे आपल्याला खरेच वाटते?
- लोकसभेला जे एक नरेटिव्ह सेट केले होते ते आता बदलले आहे. राज्यघटना बदलणार, असे सांगणारे नरेटिव्ह त्यांनी आणले होते. आरक्षण जाणार म्हणूनही ते सांगत होते. त्यांनी या राज्यातील आदिवासींना घाबरवले, मुस्लिम, ख्रिश्चनांना घाबरवले; पण आता लोकांना या घाबराघाबरवीतला खोटेपणा कळून चुकला आहे. लोक आता त्यांच्या खोटेपणाला भुलायला तयार नाहीत. विरोधकांचे खोटे मुखवटे उघड झाल्यानेच महाराष्ट्रातील वारे बदलले. आज वारे महायुतीच्या बाजूने वाहत आहेत. लोक आम्हाला बहुमत देऊन पुन्हा सत्तेवर आणतील.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा पराभव झाला. आता विधानसभेला सामोरे जाताना त्या निवडणुकीत आणि या निवडणुकीत असा काय फरक आपल्याला जाणवतो?
- लोकसभा निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवली जाते. प्रचाराचे मुद्दे राष्ट्रीय स्वरूपाचे असतात. त्यानुसार लोकसभा निवडणूक लढवली गेली. त्यातही आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सर्वात चांगला राहिला. विधानसभा निवडणूक स्थानिक विषयांवर लढवली जाते. आम्ही आतापर्यंत घेतलेले निर्णय घेऊन लोकांसमोर जात आहोत; मग या निर्णयात समाजाचे सर्व घटक आहेत. त्यात लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, शेतकरी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. या सार्यात लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली. कारण, बहिणींच्या कुटुंबाला दरमहा एक आधार देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. तो आधार आता या बहिणींना जाणवतो आहे. कारण, मीदेखील एका सर्वसामान्य कुटुंबातूनच आलो आहे. माझी आई कशी काटकसर करून घर चालवायची, ते मी पाहिले आहे. आता तर या बहिणींना दीड हजारच नाही, तर 2,100 रुपये आम्ही देणार आहोत. केवळ विधानसभेचा वचननामा म्हणून आम्ही हे सांगत नाही. मी हे फार आधीच जाहीर केले आहे. सरकारची ताकद वाढली की, आमच्या बहिणींचीही ताकद वाढवणार. कारण, शिवरायांच्या या महाराष्ट्रात आम्ही आर्थिक ताकद देऊन महिलांचा आत्मसन्मान वाढवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जशी लखपती दीदी योजना आणली, ड्रोन दीदी योजना आणली, बेटी बचाव, बेटी पढाव योजना आणली, उज्ज्वला योजना आणली अशा अनेक योजना महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणल्या. महाराष्ट्रानेदेखील तशा अनेक योजना केल्या. त्यामुळे अत्यंत खूश असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी आणि आजी- आजोबा म्हणजे ज्येष्ठ मंडळी मतदानाच्या दिवसाची वाट बघत आहेत. महायुतीला कधी मतदान करतो, याची ओढ त्यांना लागली आहे.
पण, शेवटी सरकामधल्या तीन भावांपैकी कुठला भाऊ अधिक लाडका ठरणार आहे? बहिणींचा सर्वाधिक कल मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आहे, असे म्हणता येईल का? आपला व्यक्तिगत फीडबॅक काय आहे?
- हे बघा, मुख्यमंत्री म्हणून मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असे आम्ही मिळून निर्णय घेतले. आमचे एक टीमवर्क आहे. आम्ही मिळूनच मोठे निर्णय घेतले आणि अंमलातदेखील आणले. लोकांच्या बाजूचे, लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सहकार्याची, अत्यंत व्यवहारी भूमिका असते. त्यामुळे श्रेय काही माझ्या एकट्याचे नाही. ते आमच्या टीमचे आहे.
तरीही मुख्यमंत्रिपदाचे मोठे दावेदार म्हणून आज महायुतीमधून तुमचेच नाव चर्चेत आहे. महायुतीने तसे जाहीर केलेले नसले, तरी महायुतीचे नेतृत्व आपल्याकडे चालत आले आहे, असे दिसते. ते कसे?
- हे बघा, आमच्यात अशी कोणतीही स्पर्धा नाही. मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद आमच्यात नाही. विधानसभेचे निकाल लागल्यानंतर आम्ही महायुतीचे नेते आणि भाजप श्रेष्ठी मिळून निर्णय घेऊ, हे ठरलेलेच आहे.
आम्हाला वेगळ्या मुद्द्यांकडे आपले लक्ष वेधायचे होते. आज तुम्ही शिवसेना पक्षाचे मुख्य नेते असला, तरी भाजप श्रेष्ठींचा सर्वाधिक विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे, हे चित्र आता लपून राहिलेले नाही. भाजप श्रेष्ठींचा हा विश्वास आपण कसा कमावला?
- मी मुख्यमंत्री महायुतीचा आहे. महायुतीमध्ये आमची शिवसेनापण आहे, भाजपपण आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसपण आहे. त्यामुळे तसे होणे साहजिक आहे आणि मी मुख्यमंत्री म्हणून, आम्ही एक टीम म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. मुख्यमंत्री म्हणून माझाही विश्वास भाजपच्या केंद्रीय नेत्यांवर पूर्णपणे आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून डबल इंजिन सरकार म्हणूनच आम्ही मिळून काम करतोय आणि म्हणूनच राज्याला आम्ही पुढे नेऊ शकलो. बघा, दहा वर्षांमध्ये मनमोहन सिंग सरकारने महाराष्ट्राला दोन लाख कोटी रुपये दिले होते. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राला दहा वर्षांत दहा लाख कोटी रुपये दिले. आमची कुठलीच योजना केंद्र सरकार थांबवत नाही. त्यामुळेच आम्हीही काम करतोय. आज 76 हजार कोटी रुपये वाढवणच्या बंदराला दिले. त्या भागासाठीच नाही, तर महाराष्ट्रासाठी हा गेम चेंजर प्रकल्प ठरेल. मराठवाडा वॉटर ग्रीडला पैसे देताहेत, रेल कनेक्टिव्हिटीला, रोड कनेक्टिव्हिटीला पैसे देताहेत. हे असे एक विचारांचे सरकार केंद्रात आणि राज्यात असेल, तर त्याचा फायदा राज्याला होतो. ओघानेच जनतेला होतो. आता पंतप्रधान गृहनिर्माण योजनेत सर्वाधिक घरे छत्तीसगडनंतर महाराष्ट्राला मिळाली. कारण, पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रावर प्रेम आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचीच विरोधकांना पोटदुखी आहे. एकदा तर साखर उद्योग अडचणीत आला होता, काही कारखाने बंद पडणार होते, शेतकर्यांचा ऊस गेला नसता, शेतकर्यांचे नुकसान झाले असते, अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदींनी साखर कारखान्यांचा दहा हजार कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स माफ करून टाकला.
महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र आणि खासकरून सहकारी साखर कारखान्यांचा संपूर्ण कंट्रोल केंद्र आपल्या हाती घेणार असल्याचे आता म्हटले जात आहे. त्याचे काय?
- काही नाही हो, विरोधकांना दुसरे काही धंदे आहेत का? टीका करायची, आरोप करत सुटायचे, बस्स! अरे, पॉझिटिव्ह कधी तरी काही बोला! आज केंद्र सरकार मदत करते आहे, तर त्याचा फायदा सहकाराला होईल, साखर कारखान्यांना होईल, या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या छोट्या-छोट्या घटकांना होईल आणि शेतकर्यांना होईल, हा विचार का नाही करत? तुम्ही तर केंद्राकडे काही मागितलेच नाही, केंद्राशी दोन-अडीच वर्षे भांडतच राहिलात. याउलट आम्ही केंद्राकडून मागून घेतोय. त्यात आम्हाला काही कमीपणा नाही. आम्ही राज्यासाठी मागतोय. राज्यातल्या जनतेसाठी मागतोय. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी हे केले नाही. त्यांचा अहंकार नडला. राजा असा अहंकारी असेल, तर राज्य प्रगतीकडे नव्हे, अधोगतीकडे जाते. अडीच वर्षांत राज्य असेच अधोगतीकडे गेले. आम्ही पुन्हा ते सुधरवले. पुन्हा नंबर एकला आणले.
नरेंद्र मोदी या नावाची जादू आजही कायम आहे आणि विधानसभा निवडणुकीत ही जादू उपयोगी ठरेल, असे तुम्हाला अजूनही वाटते काय?
- मोदी नावाच्या जादूचा चमत्कार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही नक्की दिसेल. एक जागतिक नेते म्हणून नरेंद्र मोदींचा जागतिक पातळीवर उदय झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाला जागतिक मान्यता आहे. 2014 मध्ये देशाची सत्तासूत्रे हाती घेतल्यापासून मोदींनी देशाला अभूतपूर्व विकासाच्या महामार्गावर आणून ठेवले आहे. विरोधकांना काहीही म्हणू देत, पंतप्रधान मोदी सलग तिसर्यांदा लोकशाही मार्गानेच निवडून आले आहेत. या देशाचे ते एक उत्तुंग नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही या विधानसभा निवडणुकाही जिंकणार आहोत. मला त्याबद्दल तिळमात्र शंका नाही.