Published on
:
18 Nov 2024, 4:20 am
Updated on
:
18 Nov 2024, 4:20 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीची रंगत अंतिम टप्प्यात आली आहे. चौकसभा, स्टार प्रचारकांच्या सभा यांसह वैयक्तिक भेटीगाठींमार्फत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहाेचण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. अशातच काही उमेदवारांकडून 'मनी अँड मसल' चा वापर सुरू झाला आहे. त्यासाठी स्थानिक गुंड, गुन्हेगारांसह इतर विधानसभा क्षेत्रांतील, परजिल्ह्यांतील गुन्हेगारांचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे प्रचाराच्या बहाण्याने पैसे वाटप होत असल्याचेही आरोप होत आहेत. मात्र, हे आरोप समर्थकांमार्फतच होत असून, पोलिसांकडे कोणीही तक्रार करत नसल्याने आरोपांबाबतही संदिग्धता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात व्हावी, यासाठी पोलिस यंत्रणांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ठराविक कालावधीसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातून तडीपार केले आहे. या गुन्हेगारांमध्ये काही जणांचा राजकीय लोकप्रतिनिधींशी किंवा राजकारणाशी संबंध आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना ऐन निवडणूक काळात त्यांचे वर्चस्व असलेले किंवा त्यांचा मतदारसंघ सोडून इतरत्र जावे लागत आहे. अशा वेळी काही राजकीय व्यक्तींनी या गुन्हेगारांना हाताशी ठेवत त्यांच्यामार्फत प्रचाराची कामे केली जात असल्याचे बोलले जात आहे. या गुन्हेगारांसह काही स्थानिक कार्यकर्ते प्रचारात गुंतले असून, आपल्याच 'भाऊ, नाना, अण्णा, आप्पा, साहेब' यांना मतदान करा, असे आवाहन करीत आहेत, तर काहींनी चोरीछुप्या पद्धतीने पैसेवाटपासाठी या गुन्हेगारांचा वापर केल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडे कोणीही तक्रार करत नसल्याने हा प्रश्न गंभीर होण्याची भीती वर्तवली जात आहे.
मतदारांना मतदार स्लिपवाटप करण्याच्या बहाण्याने पैसे वाटप केले जात असल्याचे आरोप शहरात झाले. या कारणांवरून नाशिक पूर्व व पश्चिम मतदारसंघांमधील प्रमुख उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले. यात अंबड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत, तर पंचवटीत अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. मात्र पैसे वाटपाचे आरोप समर्थक एकमेकांवर करत असले, तरी त्याची तक्रार पोलिसांकडे करणे अपेक्षित असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. तक्रार आल्यास त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी केली जाईल तसेच तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल, असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.
गुन्हेगार-राजकीय संबंध सर्वश्रुत
गुन्हेगार आणि राजकारण्यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. ज्या गुन्हेगारांना शहरातून किंवा ग्रामीण भागातून तडीपार केले आहे, ते राजकीय संबंध वापरून दुसऱ्या भागात जाऊन प्रचारात पडद्यामागील भूमिका बजावत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वादविवादाचे प्रसंग होण्याची शक्यता असून, मतदारांवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे. शहरातून तडीपार केलेले काही गुन्हेगार ग्रामीण भागातील प्रचारात सक्रिय असल्याची चर्चा आहे.