शिरजगाव कसबामध्ये आज सर्वात मोठा कार्तिक रथोत्सव:पंचक्रोशीतील गावांपैकी याच गावात कार्तिक स्वामीचे मंदिर
2 hours ago
1
चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे सोमवार, १८ नोव्हेंबरला कार्तिकस्वामी त्रिजटा उत्सव हर्षोल्लासात साजरा करण्यात येणार आहे. एक दशकापासून हा कार्तिक समाप्ती उत्सव ग्रामस्थांकडून दरवर्षी साजरा केला जातो. पंचक्रोशीतील गावांमध्ये हेच एकमेव कार्तिकस्वामींचे मंदिर असून ते भुयारात आहे. पौराणिक महत्त्व लाभलेल्या मेघा नदीच्या काठावर व सातपुडा पर्वत रागांच्या कुशीत असलेल्या शिरजगाव कसबा गावातील कार्तिकस्वामी त्रिजटा उत्सवाला शिव पुराणातील पौराणिक संदर्भ आहे. कार्तिक स्वामी मंदिराच्या वरच्या बाजूला साईबाबांचे मंदिर व भुयारात जाताना पंचमुखी कार्तिक स्वामींची मूर्ती विराजमान आहे. मागच्या बाजूला वाहन मोर उभे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साईबाबा व श्री गणेशाचे दर्शन महिलांना घेता येते. कार्तिक स्वामींच्या मंदिराच्या समोरील आठवडी बाजार परिसरात दरवर्षी श्रीमद् भागवत सप्ताह तसेच महाप्रसादाचे आयोजन मंदिर समितीतर्फे करण्यात येते. कार्तिक महिन्यात गावातील प्रत्येक भागातून महिनाभर पहाटे काकड दिंडी काढल्यानंतर काकड आरती केली जाते. त्रिजटा उत्सवाला रथ काढून कार्तिक स्वामी मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर दहीहंडी केली जाते. उपस्थित सर्व भाविक यावेळी महाप्रसाद घेतात. या रथोत्सवात सर्वच नगर भागातून फुलांनी सजवलेले भव्य रथ सहभागी होतात.राम-लक्ष्मणाची वेशभूषा केलेले रथातील लहान बालके सर्वांचे आकर्षण असते. पारंपारिक वाद्य, टाळ, मृदंग, दिंडी, भजन मंडळी रथाच्या पुढे मार्गक्रमण करत असतात. या गावांतील सासरी गेलेल्या मुली दिवाळीला न येता या कार्तिक त्रिजटा उत्सव, भाऊबीज करण्यासाठी गावात आवर्जून येत असतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून आजही पाळली जात आहे. लाखो भाविकांची या महोत्सवाला उपस्थिती असते. त्यामुळे पोलीस प्रशासन स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय व महावितरण कंपनी यांचे मोलाचे सहकार्य लाभते. एवढ्या मोठ्या संख्येने होत असलेल्या या उत्सवाची प्रशासनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवामध्ये नोंद नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र असणाऱ्या या गावाचा विकास करताना निधी अपुरा पडत आहे. यावर्षी विधानसभा निवडणूक असल्याने उत्सवाला नेत्यांसह तसेच उमेदवारी राहण्याची शक्यता आहे. कार्तिक पौर्णिमेलाच घेता येते महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यास महिलांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नसतो.स्त्रियांना कार्तिक महिन्यामध्येच पौर्णिमेलाच फक्त दर्शन घेता येते. याला पुरातन ग्रंथामध्ये पौराणिक संदर्भ आहे. विदर्भामध्ये येथे हे एकमेव मंदिर असून, दरवर्षी त्रिजटा उत्सवाला पौर्णिमेचे तिसरे दिवशी विदर्भातील लाखो भाविक एकत्र येत असतात.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)