शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शेतमालाला हमीभाव या सामान्य लोकांशी संबंधित प्रश्नांवर बोलण्याऐवजी भाजपचे नेते धर्मांधता पसरवत आहेत. घटनात्मक पदावर बसलेले योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन सरकारच्या कामावर बोलण्याऐवजी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा देतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ‘वोट जिहाद’ आणि मताला धार्मिक युद्ध म्हणतात. हे त्यांच्या पदाला शोभा देणारे नाही. भाजपने नेहमीप्रमाणे पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, मंदिर-मशीद हाच प्रचार सुरू केला आहे. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपला सुनावले.
काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते टी. एस.सिंगदेव, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा महंमद आणि प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड उपस्थित होते.
सचिन पायलट म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. संबंध देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा देतो. त्यामुळे या निवडणुकीत सरकार बदलून महाराष्ट्र देशाला योग्य दिशा देईल. भाजपने महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक हरियाणा आणि जम्मू-कश्मीरच्या निवडणुकीबरोबर घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजपला हिसका दिल्याने ते एकत्रित निवडणूक घेण्यास घाबरले असतील, अशी टीका पायलट यांनी केली. महायुतीच्या पंधराशे रुपयांत महिलांना मदत होणार नाही. 450 रुपयांचा घरगुती गॅस सिलिंडर हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. लोकांना फसवून आणि गद्दारी करून आलेले हे महायुती सरकार सत्तेतून घालवण्याची वेळ आली असल्याची टीका पायलट यांनी केली.
शिंदेंच्या नावाची घोषणा का नाही?
आम्ही सत्तेसाठी एकत्र आलेलो वाचविण्यासाठी आमची आघाडी आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये मात्र एकसूत्रता नाही. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. मग भाजप त्यांना परत मुख्यमंत्री करेल का, हे भाजपने घोषित करावे. त्यांच्याकडे अनेकजण बाळगून आहेत, असा टोला त्यांनी लगावला. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे ठिकठिकाणी हेलिकॉप्टर चेकिंग होत असल्याच्या प्रश्नांवर बोलताना हेलिकॉप्टर चेक करण्यापेक्षा अॅम्ब्युलन्स, पोलीस वाहने तपासा. त्याचा वापर सरकार करू शकते, अशी टीका त्यांनी केली.