‘बटेंगे-कटेंगेचा तडका, अंग अंग भडका’ अशी महायुतीतील आणि भाजपमधील काही मंडळींची अवस्था झाली आहे. तीच अस्वस्थता या घोषणांना होणाऱ्या त्यांच्या जाहीर विरोधातून दिसून येत आहे. भाजपने हा तडका देऊन महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम भडका उडविण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यावरून महायुती आणि खुद्द भाजपमध्येच भडका उडाला आहे. भाजपवाल्यांनी खुशाल त्यांच्या‘घोषणांच्या नंदनवना’त राहावे, पण तुमचा हा तडका आणि भडका महाराष्ट्रात चालू देणार नाही, असाच निर्धार येथील जनतेने केला आहे. मि. फडणवीस, राज्यातील जनतेचा ‘मिजाज’ हाच आहे!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंतच्या प्रचारात भाजपसह सत्ताधारी महायुतीला महाराष्ट्रातील जनता ‘एक दिलाने’ घरी बसवणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचाराचा फोकस नेहमीप्रमाणे जातीय-धार्मिक मुद्द्यांवर नेण्यास भाजपवाल्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या आवडत्या हिंदू-मुस्लिम मुद्द्याला ही मंडळी उठता-बसता ‘फोडणी’ घालत आहे. त्यावर ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ वगैरे विषारी घोषणांचा तडका देत वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा तवा तापवून त्यावर मतांची पोळी भाजून घ्यायची, हाच भाजपचा या घोषणांमागील सुप्त हेतू आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ ही आणि पंतप्रधान मोदी वाजवीत असलेली ‘एक हैं तो सेफ है’ ही पिपाणी सर्वत्र वाजवली जात आहे. सोशल मीडियावरही भाजप आणि परिवारातील सायबर धाडी या घोषणांना पूरक पोस्ट्स व्हायरल करून भाजपचा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवीत आहेत. हे सगळे जोरात सुरू असले तरी ‘बटेंगे तो कटेंगे’च्या फोडणीचा ठसका भाजपच्या मित्रपक्षांनाच नाही, तर स्वपक्षातील काही मंडळींनाही लागला आहे. अजित पवार यांनी तर या घोषणेला
थेटच विरोध
दाखवला आहे. एवढेच नव्हे तर ‘‘हा उत्तर प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारांवर चालतो. ‘बटेंगे तो कटेंगे’ हे आपल्याला मान्य नाही,’’ असे उपदेशामृत मोदी, योगी आणि फडणवीसांच्या भाजपला पाजले आहे. सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार असलेले आणि मुलीला ‘कमळ’ चिन्हावर विधानसभा निवडणुकीत उतरविलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही स्वतःला भाजपच्या ‘बटेंगे-कटेंगे’च्या ‘आदर्शा’पासून दूर ठेवले आहे. ‘‘आपण सेक्युलर हिंदू असून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आपला अजेंडा आहे,’’ असे मूळ सूरच अशोक चव्हाणांच्या पोटातून ओठात आले आहेत. नगरच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या घोषणेला विरोधच केला आहे. तिकडे पंकजा मुंडे यांनी या घोषणेला जाहीर नापसंती दर्शवली. नंतर त्यांनी घूमजाव केले असले तरी सत्य बाहेर येऊन गेलेच. महायुतीमधील एक घटक पक्ष आणि स्वपक्षातील काही घटक यांच्या या ‘सत्य’ कथनाला आता फडणवीस महाशय ‘व्हाईट वॉश’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणे, ‘‘जनतेचा मिजाज म्हणजे कल समजण्यास या मंडळींना वेळ लागेल.’’ अहो फडणवीस, आधी तुमचे आणि तुमच्या पक्षाचे बघा. तुमच्या
पायाखाली काय जळते
आहे ते पहा. ‘बटेंगे तो कटेंगे’सारख्या भडकाऊ घोषणा देऊनही महाराष्ट्रातील जनता अजिबात भडकणार नाही आणि तुमच्या हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाच्या भूलथापांना बळी पडणार नाही. महाराष्ट्रातील जनतेचा सध्याचा ‘मिजाज’ हाच आहे आणि हेच सत्य आहे. तुमच्या मित्रपक्षांना आणि स्वपक्षातील काहींना हा ‘मिजाज’ लक्षात आला आहे. त्यामुळेच ते या घोषणाबाजीवरून अस्वस्थ आहेत आणि या घोषणेपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा आटापिटा ते करीत आहेत. मोदींच्या जाहीर सभांपासूनही स्वतःला दूर ठेवत आहेत. ‘बटेंगे-कटेंगेचा तडका, अंग अंग भडका’ अशी महायुतीतील आणि भाजपमधील काही मंडळींची अवस्था झाली आहे. तीच अस्वस्थता या घोषणांना होणाऱ्या त्यांच्या जाहीर विरोधातून दिसून येत आहे. भाजपने हा तडका देऊन महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम भडका उडविण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यावरून महायुती आणि खुद्द भाजपमध्येच भडका उडाला आहे. महाराष्ट्रातील जनतेनेदेखील या भडक्यावर पूर्ण पाणी ओतण्याचे ठरविले आहे. भाजपवाल्यांनी खुशाल त्यांच्या‘घोषणांच्या नंदनवना’त राहावे, पण तुमचा हा तडका आणि भडका महाराष्ट्रात चालू देणार नाही, असाच निर्धार येथील जनतेने केला आहे. मि. फडणवीस, राज्यातील जनतेचा ‘मिजाज’ हाच आहे!