>> प्रसाद ताम्हनकर
आपल्या देशात वर्षभर कुठे ना कुठे निवडणुकांचे वारे हे वाहत असतात. लोकसभा, राज्यसभा अशा निवडणुकांपासून ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत लोकशाहीचा हा उत्सव अविरत सुरू असतो. पूर्वीच्या काळी चौकाचौकातल्या छोटय़ा सभा, मेळावे, प्रत्यक्ष गाठीभेटी, उमेदवारांचा प्रचार करत हिंडणाऱ्या रिक्षा, पदयात्रा अशा स्वरूपात उमेदवार आपला प्रचार करीत असत. काळ बदलत गेला तसे मोठमोठे बॅनर, रेडिओ आणि टीव्हीवरच्या जाहिराती, मोठमोठय़ा मैदानावरील सभा, महिला व पुरुष यांच्यासाठी आयोजित केले जाणारे वेगवेगळे मेळावे, उत्सव, स्पर्धा अशा प्रकारांत प्रचाराच्या स्वरूपात बदल होत गेला. या बदलाला एक प्रचंड वेगळे वळण मिळाले जेव्हा सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी आणि थेट मतदार राजाशी संपर्क साधण्यात मदत करणारे अस्त्र विविध पक्षांच्या हाती लागले.
हाती आलेले हे अस्त्र प्रभावीपणे कसे वापरावे याचे ज्ञान असलेले पक्ष आणि त्यांचे उमेदवार पूर्वीच्या काळी अगदी मोजक्या प्रमाणात होते. मात्र एकदा सोशल मीडियाचे महत्त्व कळल्यावर विविध उमेदवारांनी सोशल मीडिया सांभाळू शकणारे लोक पगारी नेमायला सुरुवात केली. पुढे तर जवळपास सर्व पक्षांनी आपले अधिकृत सायबर सेलदेखील निर्माण केले. सहज, सोपे, प्रभावी वाटणारा सोशल मीडिया हा आता एक भस्मासूर बनत चालला आहे हे वारंवार समोर येत आहे. अशातच आता अमेरिकन निवडणुकीच्या माध्यमातून अनेक सोशल मीडिया युजर्सनी कशी बक्कळ कमाई केली याच्या सुरस हकिगती समोर यायला लागलेल्या आहेत.
सोशल मीडिया हे उत्पन्नाचे साधन बनू शकते याचा अंदाज आल्यावर अनेकांनी त्याद्वारे कमाईला सुरुवात केली. या माध्यमाद्वारे प्रामाणिकपणे उत्पन्न मिळवायला कोणाची काही हरकत नसेल. मात्र अमेरिकन निवडणुकीच्या काळात अनेक लोकांनी खोटी छायाचित्रे, मॉर्फ केलेले व्हिडीओ, चुकीच्या बातम्या पसरवून प्रचंड पैसे कमावल्याचे समोर येत आहे. ही कमाईची रक्कम काहीशे डॉलर्सपासून ते हजारो डॉलर्सच्या घरात आहे. या युजर्सपैकी काही हे उघडपणे ट्रम्प यांचे पाठीराखे आहेत, तर काही कमला हॅरिस यांचे. काही मात्र स्वतंत्रपणे काम करत असतात. एखाद्या उमेदवाराला अथवा पक्षाला फायदेशीर अशा पोस्ट टाकण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना त्यासाठी मोबदलादेखील देण्यात आला असे आता काही युजर्सनी कबूल केले आहे.
मतदारांपर्यंत विशिष्ट माहिती पोहोचवण्यासाठी हजारो-लाखो फॉलोअर्स असलेल्या या युजर्सनी अनेक गैरमार्गांचा वापर केला. कोणी AI च्या मदतीने कमला हॅरिस यांचा तरुणपणी मॅकडोनाल्डमध्ये काम करत असल्याचा फोटो व्हायरल केला, कोणी मॅट्रिक्सच्या हिरोच्या जागी ट्रम्प यांना दाखवले, तर कोणी ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागची खरी कथा या नावाखाली अनेक खोटे आणि पोकळ दावे प्रसिद्ध केले. एक्स (पूर्वीचे ट्विटर) हे माध्यम यासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरले गेल्याचेदेखील उघड झाले आहे. अनेकांना हा कमाईचा मार्ग सोपा वाटल्याने अशा खोटेपणा करणाऱया लोकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
अमेरिकन निवडणुकांच्या निमित्ताने हा पैशांचा आणि खोटेपणाचा खेळ मोठय़ा प्रमाणावर सामोरा आलेला असला तरी हिंदुस्थानातील अनेक राजकीय निरीक्षक, सायबर तज्ञ यासंदर्भात वेळोवेळी सावध करत आलेले आहेत. मोबाइलच्या क्रीनवर येणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माहिती ही खरी असते हा समज दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक तुमचे मत तुम्हाला बनवून देत असतात हे वेळीच ओळखण्याची गरज आहे. तुमचे मत आणि तुमचा उमेदवार तुम्ही स्वतच्या अक्कल हुशारीने आणि अनुभवाने निवडा. तुमचे मत कोणाला जावे, तुमचे विचार कोणत्या दृष्टीने धावावेत हे ठरवण्याचा हक्क फक्त तुमचा आहे. त्यासाठी नीट अभ्यास करा, समोर आलेली प्रत्येक गोष्ट चार वेळा तपासा, तिचे खरे-खोटे याचे नीट आकलन करा आणि मग एखाद्या निष्कर्षावर या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खोटय़ा माहितीला फसू नका आणि अशी माहिती पसरवणाऱ्याची तक्रार करायला घाबरू नका.