Published on
:
17 Nov 2024, 1:15 am
Updated on
:
17 Nov 2024, 1:15 am
रत्नागिरी : दीपक कुवळेकर
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व 288 जागांसाठी मतदान झाले. भाजपला 106, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 53, काँग्रेसला 43, अपक्ष व इतर 28 असे पक्षीय बलाबल होते. मात्र सत्तासंघर्षासाठी मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. जिल्ह्यात शिवसेनेने 4 जागा मिळवत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. तर राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हे झाले होते.
या निवडणुकीत एकूण 61.4% मतदान झाले होते. निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. परंतु सरकार स्थापनेवरील मतभेदानंतर युती विसर्जित झाली आणि राजकीय संकट निर्माण झाले. कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्याने मंत्रिपरिषद स्थापन झाली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तथापि, या दोघांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी या नवीन युती अंतर्गत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. भाजप-शिवसेना राष्ट्रवादी महायुती असून भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.(Maharashtra assembly poll)
राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी यांनी हॅट्ट्रीक साधली. त्यांनी तब्बल 11 हजार 876 मतांनी काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा पराभव केला. साळवी यांना 65 हजार 433, लाड यांना 53 हजार 557, बसपाचे महेंद्र पवार यांना 1 हजार 554, मनसेचे अविनाश सौंदळकर यांना 6 हजार 150, अखिल भारत हिंदू महासभेचे विलास खानविलकर यांना 1 हजार 175 तर नोटाला 2 हजार 576 मते मिळाली.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उदय सामंत हे चौथ्यांदा निवडून आले. त्यांनी विक्रमी मताधिक्य घेत राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांचा पराभव केला. 87 हजार 335 मतांनी ते विजयी झाले. सामंत यांना 1 लाख 18 हजार 484 तर मयेकर यांना 31 हजार 149 मते मिळाली. बसपाचे राजेश जाधव यांना 1 हजार 707, वंचित बहुजन आघाडीचे दामोदर कांबळे यांना 4 हजार 621, बहुजन मुक्ती पार्टीचे बाळा विचारे यांना 518, काँग्रेसचे संदीप गावडे यांना 2 हजार 35 तर नोटा 4 हजार 552 मते मिळाली.(Maharashtra assembly poll)
चिपळूण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे शेखर निकम हे निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचा तब्बल 29 हजार 924 मतांनी पराभव केला. गत निवडणूकीत चव्हाण यांनी निकम यांचा फक्त 6 हजार 68 मतांनी पराभव केला होता. या निवडणूकीत मात्र निकम यांनी बाजी मारली. निकम यांना 1 लाख 1 हजार 578 तर चव्हाण यांना 71 हजार 654 मते मिळाली. तसेच बसपाचे सचिन मोहिते 2 हजार 392, नोटाला 2 हजार 297 मते मिळाली. गुहागर विधानसभा मतदार संघात भास्कर जाधव यांनी हॅट्ट्रीक साधली. त्यांनी राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर यांचा 26 हजार 451 मतांनी पराभव केला. भास्कर जाधव यांनी या निवडणूकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.
जाधव यांना 78 हजार 748, बेटकर यांना 52 हजार 297, बसपाचे उमेश पवार यांना 2 हजार 9, मनसेचे गणेश कदम यांना 2 हजार 524, वंचित बहुजन आघाडीचे विकास जाधव यांना 5 हजार 69 मते मिळाली. तर नोटाला 2 हजार 61 मते मिळाली.दापोली विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम हे विजयी झाले. त्यांनी विद्यमान आमदार संजय कदम यांचा 13 हजार 578 मतांनी पराभव केला. या मतदार संघात तब्बल 11 उमेदवार उभे होते. कदम यांना 95 हजार 364, कदम यांना 81 हजार 786, बसपाचे प्रविण मर्चंडे यांना 2 हजार 15, वंचित बहुजन आघाडीचे संतोष खोपकर यांना 1 हजार 336, अपक्ष योगेश दिपक कदम यांना 144, अपक्ष सुवर्णा पाटील यांना 832, अपक्ष विकास बटावले यांना 118, अपक्ष विजय मोरे यांना 113, अपक्ष संजय दगडू कदम यांना 112, अपक्ष संजय सिताराम कदम यांना 256, अपक्ष संजय संभाजी कदम यांना 1 हजार 74 तर नोटाला 2 हजार 711 मते मिळाली.(Maharashtra assembly poll)
सध्या एकाच नावाचे उमेदवार उभे करून थोडासा संभ्रम निर्माण करण्याची पद्धत निर्माण झाली आहे. या निवडणुकीत संजय कदम नावाचे एकूण 4 उमेदवार होत, तर योगेश कदम नावाचे दोन उमेदवार होते.