2019 पेक्षा मतदान 2% वाढले, त्याचा फायदा उद्धवसेना,भाजपला होण्याची चिन्हे:उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार

11 hours ago 1
लोकसभेला मुंबईमध्ये उद्धवसेना आणि शिंदेसेनेत जवळपास बरोबरीची लढत झाली. आता विधानसभेला २०१९च्या तुलनेत सुमारे २ टक्के मतदान वाढले, अशी बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची आकडेवारी सांगत होती. त्याचा फायदा भाजप आणि उद्धवसेनेला होईल. शिंदेसेनेला मनसेचा फटका बसणार असे दिसत आहे. मुंबई कुणाची हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. त्यावर शिवसेना नेहमी आरूढ झालेली असते. यंदा प्रथमच शिवसेनेची फाळणी झाली आहे. त्यामुळे मुंबईवर उद्धवसेना आणि शिंदेसेनेची दावेदारी आहे. लोकसभेला या दावेदारीची पहिली परीक्षा झाली. त्यात उद्धवसेना, शिंदेसेनेची जवळपास बरोबरी झाली. तशीच परिस्थिती विधानसभेला असेल, असा अंदाज बांधला जात होता. काट्याची टक्कर असल्याने मतदानाचे प्रमाणही वाढेल, असे म्हटले जात होते. २०१९ च्या विधानसभेच्या तुलनेत यंदाच्या विधानसभेला सुमारे २ टक्के मतदान वाढले. मात्र त्याचा थेट फायदा शिंदेेसेनेपेक्षा उद्धवसेनेला अधिक होईल, अशी चिन्हे आहेत. मनसेच्या उमेदवारीचा पाच ते सहा मतदारसंघांत शिंदेसेना आणि दोन मतदारसंघांत भाजपला फटका बसण्याची चिन्हे आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भावनिक आवाहन केले होते. पक्ष पळवला, निवडणुकीचे चिन्ह पळवले, त्याचा पुरेपूर बदला लोकसभेला घेतला नाही. तो विधानसभेला घ्या, असा मुद्दा त्यांच्या समर्थकांनी मुंबईतील मतदारसंघांत पोहोचवला. त्यातच लोकसभेला महायुतीसोबत असलेल्या मनसेने स्वतंत्र उमेदवार दिले. त्यांची एक जागा येऊ शकते. काँग्रेसला २०१९ च्या जागा राखता येतील. अजित पवार गटाला नवाब मलिक यांची जागा राखणे कठीण जाईल, असे आकडेवारीवरून दिसत आहे. मनसेच्या पदरात एक जागा पडू शकते लोकसभेला मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेलाही मनसे महायुतीसोबत असेल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. मनसेचा प्रभाव असलेल्या मुंबईतील २७ मतदारसंघांत मनसेने उमेदवार दिले. माहीममध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित यांच्या उमेदवारीवरून महायुतीत बरीच ताणाताणी झाली. त्याचा थेट परिणाम निकालावर होऊ शकतो. माहीममध्ये अमित ठाकरे धोक्यात आहेत. शिवडीत मनसेचे नांदगावकर काठावर विजयी होऊ शकतात. मनसेचे इतर ठिकाणचे उमेदवार शिंदेसेनेला पाच ते सहा तर भाजपला दोन मतदारसंघांत धक्का देतील, अशी दाट शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article