यावेळी कडू यांनी विरोधकांवर जोरदार आसूड ओढले. सद्यस्थितीत धर्म धोक्यात नसून, शेतकरी आणि शेतमजूर धोक्यात आहे. कोणतीही आत्महत्या ही धर्मामुळे नव्हे, तर शेतीतील प्रश्नांमुळे झाली आहे असे सांगतच कडू यांनी, श्रीराम हे तुमच्या तोंडात असतील, तर आमच्या हृदयात आहेत, असे सांगितले. आज तर चक्क बागलाणमध्ये सभेला येणार्या गाड्या अडविण्यात आल्या. श्रोत्यांना सभेच्या वेळेचा चुकीचा मेसेज देण्यात आला. सत्ताधार्यांची झोप उडाली आहे. "हिंदू खतरे मे नही, नेता खतरे मे है", आता मतदारांनीच मतदानाचे शस्त्र बाहेर काढून प्रहार करावा व जयश्री गरुड यांच्या रूपाने नवीन चेहरा विधानसभेत पाठवावा, असे आवाहन कडू यांनी केले. स्वामीनाथन आयोगाने किमान 50 टक्के नफा गृहीत धरून शेतकर्यांना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव देण्याचे सुचविले होते.
परंतु मोदींनी 15 टक्के बाजारभावही दिला नसून, शेतकर्यांना उत्पादन खर्चानुसार बाजारभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी आक्रोश केला पाहिजे. परंतु आपण धर्म आणि जातीत विभागले गेले असून, हा आपला महामूर्खपणा आहे, असे सांगून घरांवर पक्षांचे झेंडे लावण्यापेक्षा शेतीशी संबंधित अपेक्षांचे बोर्ड लावा असे आवाहन त्यांनी केले. ही लढाई सामान्य माणसाची असून 10 आंदोलनाची ताकद एका मतात आहे. हत्तीचे हे बळ ओळखा. सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाचे किंवा आघाडीचे शासन सत्तेत बसू शकत नसून, त्यासाठी आमचे पाठबळ अत्यावश्यक ठरेल. अशा परिस्थितीत आमचे शासन आल्यास घरकुलांसाठी 5 लाख, दिव्यांगांसाठी 6 हजार रुपये प्रति महिना आणि कांद्याला बोनस स्वरूपात आर्थिक रक्कम देण्याची तरतूद करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. बच्चू कडू तुमचा कधीही विश्वासघात करणार नाही असे अभिवचनही त्यांनी शेवटी बोलताना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, केशव सूर्यवंशी, किरण मोरे, तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, हिंमत माळी आदींची भाषणे झाली.