बजेट 2025 सादर होण्याच्या काही तास आधी देशातील कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील सर्वसामान्य जनतेला गॅस सिलेंडरच्या दरात थोडा दिलासा मिळाला आहे. आयओसीएल आकड्यानुसार गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. वास्तवात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. मागच्या दोन महिन्यातील दर कपात एकत्र केली तर कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर 20 रुपयापेक्षा जास्त कमी झाले आहेत. दुसऱ्याबाजूला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मार्च 2024 पासून कोणताही बदल झालेला नाही. कमर्शियल आणि घरगुती गॅस सिलेंडरचे दर आता किती झालेत? ते जाणून घ्या.
सलग दुसऱ्या महिन्यात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात घसरण झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 7 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सध्या हे दर 1,797 रुपये आहेत. कोलकातामध्ये सर्वात कमी 4 रुपयांची कपात झाली आहे. तिथे दर आता 1907 रुपये आहेत. मुंबई आणि चेन्नईत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 6.5 रुपयाची कपात करण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही महानगरात कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर अनुक्रमे 1749.50 रुपये आणि 1959.50 रुपये झाले आहेत. मागच्या दोन महिन्यात देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत 21 रुपयांनी कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर घसरले आहेत.
मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरचा दर काय आहे?
दुसऱ्याबाजूला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सलग 11 व्या महिन्यात कोणताही बदल झालेला नाही. मार्च 2024 मध्ये शेवटचा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला होता. सरकारच्या घोषणेनंतर IOCL ने घरगुती गॅस सिलेंडरचे दर थेट 100 रुपयांनी कमी केले होते. सरकारने होळी आणि लोकसभा निवडणुकीआधी लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून आतापर्यंत घरगुती गॅल सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 803 रुपये, कोलकाता येथे 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईत 818.50 रुपये आहे.