गेल्या महिन्याभरात मंत्री धनंजय मुंडे एक दोन नव्हे तर तब्बल सहा सहा प्रकरणात अडचणीत आले. वाल्मिक कराड, पीक विमा ते आता करुणा शर्मा प्रकरणात कोर्टाचा निर्णय. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर धरलाय. मुंडे कसे या अडचणीच्या फेऱ्यात सापडलेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे. पण हेच मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून अडचणीच्या फेऱ्यात आलेत. करुणा शर्मांना एकूण दोन लाखांची महिन्याला पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले. पण महिन्याभरात सहा सहा प्रकरणात मुंडेंचा पाय खुलात गेलाय. पहिलं प्रकरण, बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी वाल्मिक कराडवरून मुंडेवर आरोप झाले. कराड आका असून आकाचे आका धनंजय मुंडे असल्याचा आरोप ऑन कॅमेरा भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी केला. दुसरं प्रकरणही सुरेश धस यांनीच बाहेर काढलं. गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना पाच हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप धसांनी केला. त्याचे पडसाद थेट संसदेत उमटले. सुप्रिया सुळे यांनी चौकशीची मागणी केल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तपासाला संमती दिली.
तिसरं प्रकरण आहे ऊस तोडणीचा हार्वेस्टर प्रकरण. वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन साथीदारांनी अकरा कोटींचा शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा आरोप आहे. आरोपानुसार तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेकडून अनुदान मिळवून देतो म्हणून कराडने 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले. पण अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांना दमदाटी आणि मारहाणीचाही आरोप आहे. चौथ प्रकरण… निधी वाटपाचं. गेल्या सरकारमध्ये जिल्हा नियोजन समितीने वाटप केलेल्या 877 कोटींच्या वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप झाला. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले. पाचवं प्रकरण म्हणजे गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना नॅनो युरिया, नॅनो डीएपी सह कृषी वस्तू खरेदीत 275 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आणि आता सहावा प्रकरण म्हणजे करुणा शर्मा आणि त्याच्या मुलीला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले.
Published on: Feb 07, 2025 10:52 AM