Published on
:
25 Jan 2025, 3:45 am
Updated on
:
25 Jan 2025, 3:45 am
धुळे | पेट्रोल पंप टाकण्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपये स्वीकारणाऱ्या धुळे तालुक्यातील नंदाने येथील सरपंच आणि उपसरपंचाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार यांच्या मालकीची मौजे नंदाणे येथील गट नं. ५९/३ येथे शेतजमीन असुन या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्याकरीता विभागिय व्यवस्थापक, नायरा एनर्जी लिमिटेड यांनी दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच , ग्रामसेवक, ग्रामपंचायत नंदाणे यांच्या नावे पेट्रोलपंप उभारणी करीता नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता दिलेले पत्र तकारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे जमा केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय, नंदाणे येथे जावुन सरपंच रविंद्र निंबा पाटील, ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेवुन पाठपुरावा केला असता सरपंच रविंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करीता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरीता ५,लाख रुपये लाचेची मागणी केल्याची लाच लचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार दिली होती.
तकारदार यांनी दिलेल्या तकारीची आज पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान सरपंच रविंद्र निंबा पाटील यांनी व त्यांच्यासोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान सरपंच रविंद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन १ लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारुन माजी सरपंच अतुल शिरसाठ यांच्याकडे दिली असता त्यांनी ती स्विकारुन त्यांच्या खिशात ठेवुन घेतली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द पोस्टे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.