राज्यात महायुती सरकारची स्थापन झाल्यापासून सातत्याने विविध गोष्टींवर नाराजी नाट्य पाहायला मिळत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ३७ जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची नावे जाहीर करण्यात आली. आता पालकमंत्रीपदावरुन काही मंत्री नाराज झाले आहेत. यामुळे अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. आता पालकमंत्रिपदावरुन नरहरी झिरवळ नाराज झाले आहेत. नरहरी झिरवळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. यावरुन आता ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाब विचारणार आहेत.
सध्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यात हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ सुद्धा मागे नाहीत. वसमतमध्ये आमदार नवघरे यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार कार्यक्रमाला आमदार प्रताप पाटील चिखलीकर, तानाजी मुटकुळे यांच्यासह महायुतीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नरहरी झिरवळ यांनी मिश्किल विधान केले. “तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? याबद्दल मी मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना जाब विचारणार”, असे विधान नरहरी झिरवळ यांनी केले.
तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला?
“मी आज जरा कार्यक्रमासाठी उशिरा आलो. मंत्री पहिल्यांदाच झालो. पालकमंत्री पहिल्यांदाच झालो. झालो तो झालो, आता इथे आल्यावर समजलं की हा अल्प आणि गरीब जिल्हा आहे. मी आता सोमवारी गेल्यावर विचारणार आहे की तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? असा सवाल नरहरी झिरवळ यांनी केला. पण यातूनही आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी मिळून युवकांचे प्रश्न, ज्येष्ठांचे प्रश्न असतील किंवा विविध समाजाचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेन”, असे नरहरी झिरवळ म्हणाले.
तुमच्यासमोर माांडण्याऐवजी माझ्या समोर मांडा – अजित पवार
नरहरी झिरवळ यांनी पालकमंत्रिपदावरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “असं काही होणार नाही. मी त्यांना विचारेन. दर मंगळवारी आमची मिटिंग असते. असे विधान केलं असेल तर योग्य नाही. त्यांच्याशी चर्चा करून का समज गैरसमज असेल तर दूर करेने, असे अजित पवार म्हणाले. कुणाच्या काही समस्या असेल तर मंगळवारच्या बैठकीत मांडण्याचा अधिकार आहे. त्या तुमच्यासमोर माांडण्याऐवजी माझ्या समोर मांडा, असं सांगणार आहे”, असे अजित पवारांनी सांगितले.
झिरवळ यांनी शरद पवार यांच्या पाठीतच खंजीर खुपसला
आता यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. “नरहरी झिरवळ यांना गरीब म्हणणं हा गौतम अदानीचा अपमान ठरेल. ते गरीब वगैरे काही नाहीत. गेल्या काही दिवसातील विशेषत: तुमच्या भागातील आहेत. कुठे तरी मजुरी करायचे असं त्यांनी विधीमंडळात म्हटलं होतं. त्यांना शरद पवारांनी इतक्या शिखरावर नेलं. त्यांनी शरद पवार यांच्या पाठीतच खंजीर खुपसला. हे गरीबाचं लक्षण नाही. गरीब माणूस प्रामाणिक असतो. निष्ठावंत असतो. खाल्ल्या मिठाला जागतो”, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
तर हसन मुश्रीफ यांनी “पालकमंत्रीपदाबाबत मी योग्य ठिकाणी बोललो. अजित पवार यांना सांगितलं. श्रद्धा सबुरी ठेवली आहे”, असे म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी “पालकमंत्रिपदाचा कोणता वादच नाही”, असे म्हटले.