Published on
:
27 Nov 2024, 1:47 pm
Updated on
:
27 Nov 2024, 1:47 pm
यवतमाळ : हुंड्यासाठी छळ करीत अंगावर रॉकेल टाकून सूनेचा खून करणाऱ्या सासू व दिरास दारव्हा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अजितकुमार भस्मे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडा येथे दि. १० जुलै २०१६ ला ही घटना घडली होती. अंजली दिनेश रावेकर असे मृत सूनेचे नाव असून सासू बेबीबाई गणेश रावेकर आणि दीर राहुल गणेश रावेकर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मृतक अंजली दिनेश रावेकर हिचा चाणी कामठवाडा येथील दिनेश रावेकर यांच्यासोबत दि. २ जून २०१६ रोजी विवाह झाला होता. महिनाभरातच लग्नामध्ये हुंडा कमी दिला या कारणावरुन अंजलीचा छळ सुरू केला. सासू बेबीबाई गणेश रावेकर आणि दीर राहुल गणेश रावेकर हे दोघे पती घरी नसताना १ लाख रुपयासाठी अंजलीचा मानसिक व शारीरीक छळ करीत होते. अशातच दि. १० जुलै २०१६ ला सासू व दीराने अंजलीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले.
अंजलीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना यवतमाळ तहसीलदारांनी अंजलीचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवून घेतला. त्यावरून लाडखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास सुरू असतानाच अंजलीचा मृत्यू झाला. यानंतर लाडखेड पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून खूनाचा गुन्हा दाखल केला.
लाडखेडचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक वैजनाथ वाहुळे यांनी प्रकरणाचा पूर्ण तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. तपास अधिकारी यांनी नोंदविलेल्या बयाणावरून एकून तीन आरोपी समाविष्ठ होते. त्यामध्ये मृतकाची सासू, दीर व ननंद यांचा समावेश होता. या प्रकरणात न्यायालयाने सरकारी पक्षातफे ८ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृतकाची आई, आजोबा, नायव तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी व त्यांचा चाचणी अहवाल, पोलिस उपनिरीक्षक वैजनाथ वाहुळे यांची साक्ष ग्राह्य धरुन आरोपी बेबीबाई गणेश रावेकर (वय ४८) व दीर राहुल गणेश रावेकर (वय २५) यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी ननंद माला मधुकर सदाफळे हिची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात सरकारी पक्षातफे अॅड. अमोलकुमार राठोड यांनी काम पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून प्रेम राठोड यांनी सहकार्य केले.