हिंगोली (Hingoli Crime Case) : तालुक्यातील फाळेगाव येथील तलाठी माधव भालेराव यांनी एका दिव्यांग व्यक्तीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये अनुदान मिळविण्यासाठी प्रस्तावावर स्वाक्षरीकरीता १ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्पेâ दिलेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील एका तक्रारदाराचा नातेवाईक शंकर झनक पाटोळे हे ४० टक्के दिव्यांग असून इंदिरा राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमध्ये अनुदान मिळविण्यासाठी तक्रारदाराने शंकर पाटोळे यांचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याकरीता त्यांनी फाळेगाव तलाठी सज्जा कार्यालयात १३ नोव्हेंबरला दाखल केला होता; परंतु तेथील तलाठी माधव भालेराव यांनी हा प्रस्ताव स्वत:कडे ठेवून त्यावर स्वाक्षरी व शिक्का देण्याकरीता १ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.
त्यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली कार्यालयात रितसर तक्रार दिल्यानंतर त्याची पडताळणी केल्यानंतर १४ नोव्हेंबरला अकोलाय बायपासवरील तलाठी माधव भालेराव यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक विकास घनवट, पोलीस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकुशकर यांच्यासह शेख युनूस, विजय शुक्ला, तान्हाजी मुंढे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, गजानन पवार, शेख अकबर यांच्या पथकाने सापळा रचला;परंतु तलाठी माधव भालेराव याला संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम घेतली नाही; परंतु पंचासमक्ष लाच स्विकारण्यास त्यांनी सहमती दर्शविली होती. यामुळे लाच मागितल्याच्या आरोपावरून तलाठी माधव भालेराव यांच्या विरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर हे करीत आहेत.
लाच प्रकरणात दोन महिन्यात दोन तलाठ्यांवर गुन्हे दाखल
महसूलमधील लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले असताना मध्यंतरी बळसोंड सज्जातील तलाठी विजय सोमटकर यांच्यासह अन्य खासगी व्यक्ती जयंत देशमुख या दोघांना ५० हजाराची लाच घेताना पकडले होते तर आता हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथील तलाठी माधव भालेराव यांनी दिव्यांगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याकरीता १ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. आतापर्यंत दोन तलाठ्यांवर लाच प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.