संपूर्ण देशाचं आणि काही प्रमाणात जगातील मराठी जनतेचे लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी महायुतीला निर्विवाद कौल दिला आहे. हा भारताच्या राष्ट्रवादी विचाराच्या मतदारांचा फार मोठा विजय आहे. प्रथमतः हा लोकशाहीचा विजय आहे. हा मतदारांचा विजय आहे. मात्र, भारत हे राष्ट्र, आणि त्यात महाराष्ट्राने बजावण्याच्या राष्ट्रीय भूमिकेसाठी महाराष्ट्राला बळकट करायला हवे, या जाणिवेने 20 नोव्हेंबरला मोठ्या संख्येनं मतदार बाहेर पडला.
लोकसभेच्या काळात अनेक कारणांमुळे राष्ट्रवादी म्हणावा असा कोअर मतदार अनेक कारणांमुळे घरातच थांबला होता. त्याचे परिणाम भारत आणि महाराष्ट्राच्या निकालात दिसले; मात्र आता या निवडणुकीचे राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीवेळी घरात बसलेला मतदार बाहेर पडला. 20 नोव्हेंबरला रात्री उशिरा जेव्हा मतदानाचे आकडे बाहेर आले आणि असे दिसून आले की 65 टक्क्यांच्या पार मतदान आहे, तेव्हासुद्धा सर्वसाधारणपणे लोकशाहीत अधिक मतदानाचा अर्थ ते बदलासाठीचे (अँटिइन्कम्बसी फॅक्टर) मतदान असते; मात्र 20 नोव्हेंबरच्या चित्रानुसार मी मत व्यक्त केलं होतं की, लोकसभेवेळी घरात बसलेला मतदार बाहेर पडला आहे. याचा फायदा महायुतीला होईल, असे माझे आकलन होते. आता प्रत्यक्ष निकालांमध्ये आकड्यांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडताना दिसत आहे. आता यामुळे महाराष्ट्राला विकासासाठी आवश्यक असलेले स्थिर सरकार मिळेल.
‘कांटे की टक्कर’, ‘निवडणूक घासून होईल’, ‘शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नाही’ अशा चर्चा सुरू होत्या. त्यावेळी माझ्या मनात चिंता होती की, अशा प्रकारे ही निवडणूक ‘कांटे की टक्कर’ झाल्यास घोडेबाजाराला चांगले दिवस येतील. खरेदी-विक्री, विविध जुळण्यांच्या नादात सरकार, राजकारण अस्थिर राहते. त्याचा थेट परिणाम राज्याच्या विकासावर होतो. याचा अर्थ भारताच्या विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. आता मात्र मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याने अशा प्रकारचा घोडेबाजार होणार नाही. या निकालानंतर महायुतीची जबाबदारी वाढते. त्यांनी काळाचे आव्हान ओळखून ठामपणे एक स्थिर सरकार जे विकसित भारतासाठी, विकसित महाराष्ट्रसाठी काम करेल. महाराष्ट्राचे सर्व विभाग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईत महायुतीचा मोठा विजय झाला आहे. नीट आकडे हाती आल्यानंतर विश्लेषण होईलच; मात्र असं मानायला जागा आहे की, महिलांनीदेखील मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान केलं. त्याचा अर्थ असा की, मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान महाराष्ट्राच्याही मदतीला धावून आले. महिलांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलेला दिसत आहे. निवडणुकीच्या काळात जो ‘मनोज जरांगे फॅक्टर’ होता आणि त्याचा काय परिणाम होईल, मी ज्याला दुःखद म्हणतो की, सामाजिक दुही वाढून काहीसे मराठा विरुद्ध ओबीसी असे काहीसे चित्र महाराष्ट्रात होईल का, तर निकालाच्या आकड्यांवरून उलटं गणित मांडायचे झाल्यास आनंद आहे की, जातीय दुही निर्माण होऊन त्याचा सामाजिक जीवनावर परिणाम होईल, असे निकालावरून दिसत नाही.
‘बटेंगे तो कटेंगे’चा कितपत परिणाम झाला याचा आकड्यांवरून विचार केल्यास त्याची शक्यता दिसून येते. मुस्लीम मतदान व्होट जिहादचा विचार करून ध—ुवीकरण करणार असेल, तर त्यातील अर्थ आणि धोका ओळखून प्रभाव पडू शकेल अशा पुरेशा संख्येनं राजकीय आणि गुणात्मक आणि वैचारिक द़ृष्टीनं ज्याला हिंदू मतदान म्हणता येईल, त्याचा फायदा महायुतीला होताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री कुणाचा, असा सूर कानावर येताना दिसतो. मी आशा करतो की, मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत अंतर्गत राजकारण होऊ नये. नव्या सरकारने स्थिरपणे विकासशील, गतिशील सरकार देऊन महाराष्ट्र नव्हे संपूर्ण राष्ट्राच्या विकासाला गती आणावी, हीच अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. स्थिर सरकार निर्माण झाल्याने राज्याच्या विकासाला नक्कीच गती मिळेल, असे वाटायला वाव आहे.