काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अनेक मातब्बर नेत्यांचा राज्यभर महायुतीच्या लाटेत पाडाव झाला. इस्लामपुरात आमदार जयंत पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत विरोधकांनी हादरा दिलेला गड कसाबसा ताब्यात ठेवला. तालुक्यातील मुख्य शहरांमधील इस्लामपूरने जयंतरावांना, तर आष्टा आणि परिसराने (मिरज पश्चिम) निशिकांत पाटील यांना साथ दिल्याचे निकालातून दिसले. दुरंगी थेट लढतीचा लाभ निशिकांत पाटील यांना झाला, तर इकडे महायुतीच्या महालाटेत जयंत पाटील यांचे मताधिक्य सुमारे 60 हजाराने घटले.
वाळवा तालुक्यातील मुख्य शहर असलेल्या इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटील यांना 24 हजार 412, तर निशिकांत पाटील यांना 17 हजार 182 मते मिळाली. इस्लामपूर शहराने 7 हजार 230 चे दिलेले मताधिक्य जयंत पाटील यांना तारणारे, तर निशिकांत पाटील यांना अडचणीत आणणारे ठरले. याआधीच्या निवडणुकांचा आढावा घेतल्यास गतवेळी 72 हजाराच्या आसपास जयंत पाटील यांचे मताधिक्य होते. यावेळी हे मताधिक्य अवघ्या 13 हजारावर आले आहे. त्यांच्या मताधिक्यामध्ये तब्बल 60 हजारांनी घट झाली. राजारामबापू समूहाच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी सहकाराचे जाळे विस्तारले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उबाठा, मनसे व इतर संलग्न पक्ष आणि इस्लामपूर परिसरात निवडणुकीच्या उंबरठ्यावर दाखल झालेल्या पुरोगामी चळवळीमधील संघटना; असा सगळा ताफा जयंत पाटील यांचे मताधिक्य टिकवू शकला नाही.
निशिकांत पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजपा तसेच शिवसेनेचे आनंदराव पवार आणि आजी-माजी नगरसेवकांमधून कपिल ओसवाल, अमित ओसवाल या महाडिक समर्थकांनी प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेतला. महायुतीकडून शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, तसेच हुतात्मा समूहातून गौरव नायकवडी इच्छुक होते. मात्र निशिकांत पाटील यांनी सार्यांविरोधकांची मोट जुळवून आणली. माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आनंदराव पवार, भाजपाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक, हुतात्मा समूहाचे वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, केदार पाटील, भाजपचे विक्रम पाटील, काँग्रेसचे वैभव पवार, पै. भीमराव माने, इस्लामपुरातून महाडिक समर्थक कपिल व अमित ओसवाल बंधू, आष्टा येथून प्रवीण माने, भाजपाचे पै. पृथ्वीराज पवार, मनसेचे सनी खराडे सक्रिय होते. धैर्यशील मोरे, महायुतीचे समन्वयक प्रसाद पाटील यांच्याबरोबरच ऐन निवडणुकीच्या उंबरठ्यावर निशिकांत पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या गटात प्रवेश केलेले माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे, जयवंत पाटील; अशा स्थानिक नेतेमंडळींनी प्रस्थापितांना हादरा देण्याचा जोरदार प्रयत्न केला. या सार्या पार्श्वभूमीवर निशिकांत पाटील यांनी गतवेळच्या सुमारे 44 हजार मतांपासून दुप्पट मतांचा आकडा घेत आता 96 हजारपेक्षा पुढे गेले. ही विरोधकांची जमेची बाजू. दुसरीकडे राजारामबापू शिक्षण आणि उद्योग समूह, पक्षसंघटन, गेल्या 35 वर्षातील सत्तेच्या माध्यमातून गावोगावी केलेली विकासकामे, कार्यकर्त्यांचे जाळे; या जोरावर महायुतीच्या महालाटेत जयंत पाटील यांनी एक लाखापुढे आपला मतांचा आकडा कसा बसा टिकविला आहे.
आष्ट्यासह मिरजपूर्व भागातील गावांमध्ये निशिकांत पाटील यांची लक्षवेधी लढत
माजी आमदार विलासराव यांच्यासोबत बेरजेचे राजकारण करताना जयंत पाटील यांनी आष्टा परिसरातील विकासकामांना बळ दिले. या जोरावर आष्टा येथून जयंत पाटील यांना पाच ते सहा हजार मताधिक्य मिळेल, अशी चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात अवघे 83 एवढेच मताधिक्य त्यांना मिळाले. त्यामुळे या शहरात आणि संबंध परिसरावर निशिकांत पाटील यांनी प्रभाव पाडल्याचे दिसते. कारण इस्लामपूर मतदारसंघात येणार्या पण मिरज तालुक्यातील आठ-नऊ गावांमधून निशिकांत पाटील यांनी घेतलेली अडीच हजार मतांची आघाडी जयंत पाटील यांना धक्का देणारी आहे.