Published on
:
25 Nov 2024, 12:40 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:40 am
सावंतवाडी ः महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत अभिनंदन केले. राज्यातील नव्या ट्रिपल इंजिन सरकारसाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात महाविजय प्राप्त केल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी महायुतीच्या नेत्यांची भेट घेत अभिनंदन केले. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून सलग चौथ्यांदा विजयश्री प्राप्त केलेल्या दीपक केसरकर यांचेही अभिनंदन केले.
केसरकर हे निकालानंतर रात्रीच मुंबईला रवाना झाले. नवीन सरकार बसवण्यासाठी सध्या जोरदार घडामोडी सुरू झाल्या असून केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मुंबईला बोलावून घेतले. नव्या सरकारमध्ये केसरकर यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागू शकते अशी शक्यता आहे, परंतु केसरकर यांनीच आपल्याला आता कोकणची जबाबदारी हवी असल्याचे आणि तशी ती जबाबदारी आपण मुख्यमंत्र्यांकडून मागून घेणार असल्याचे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वेळोवेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते. एकूणच या पार्श्वभूमीवर त्यांना पुनश्च मंत्रीपदाची लॉटरी लागणार की त्यांच्यावर अन्य कुठली जबाबदारी सोपवली जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.