भारतीय राजकारणाच्या प्रदीर्घ खेळात अशा प्रकारचे ऑपरेशन प्रथमच यशस्वी झाले.
Published on
:
25 Nov 2024, 12:49 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:49 am
महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीच्या पराभवामागे अनेक संदेश दडलेले आहेत. काँग्रेससाठी हा धडा तर आहेच; पण भारतीय राजकारणाचा पारंपरिक वंश पुढे नेणार्यांसाठीही यात छुपा संदेश आहे. शिवसेनेच्या (उबाठा) पराभवात भारतातील एक नवे राजकीय मॉडेलही दडले आहे. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय ते राज्यस्तरीय पक्षांपर्यंतच्या जुन्या ‘राजकीय उच्चभू्रं’चा पराभव आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निकालामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पराभव भारतात एक नवीन राजकीय मॉडेल तयार करत आहे. भारतीय राजकारणात कुटुंब चालवणारा पक्ष बाहेरच्या व्यक्तीने यशस्वीपणे ताब्यात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पक्षाचे घराणेशाही वारसदार पक्षाला पुढे नेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. अनेकदा अशा पक्षावर घराणेशाहीचे वर्चस्व असते. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अशा घराण्यांनी पक्ष चालवल्याची अनेक उदाहरणे आहेत. घराणेशाहीच्या वारसांव्यतिरिक्त बाहेरच्या व्यक्तीने पक्ष खरा असल्याचे सिद्ध करण्याची राजकारणात ही पहिलीच वेळ आहे. भारतीय राजकारणाच्या प्रदीर्घ खेळात अशा प्रकारचे ऑपरेशन प्रथमच यशस्वी झाले आहे. या यशानंतर नेहरू-गांधी घराणे, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील यादव घराणे किंवा तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकचे संस्थापक के. करुणानिधी यांच्या घराण्याबाहेरील व्यक्तीने पक्षाची सूत्रे हाती घेतली, तर राजकारणाचे नवे रूप पाहायला मिळेल. हे अकल्पनीय असले, तरी महाराष्ट्रात ते सिद्ध झाले आहे. खरी शिवसेना आपल्या पाठीशी आहे, हे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. खर्या शिवसेनेचा निर्णय अद्याप न्यायालयात झालेला नाही; पण तो कोणत्या शिवसेनेसोबत आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने सांगितले आहे. शिंदे यांची वाटचाल एक सामान्य कार्यकर्ता ते नेता अशी आहे. ज्यांनी ऑटोरिक्षा चालक म्हणून आयुष्य सुरू केले आणि राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा प्रवास पूर्ण केला. महाराष्ट्रात जे काही घडले आहे त्यामुळे भारतभरातील कुटुंबाकडून चालवल्या जाणार्या सर्व पक्षांमध्ये थोडी भीती निर्माण झाली पाहिजे. विशेषत: जेव्हा ते अक्षम आणि सशक्त दुसर्या पिढीकडून वाईटरीत्या चालवले जात आहेत. कारण, या आदेशामुळे एक मूलभूत कोडेही निर्माण झाले आहे, ज्याचे उत्तर महाराष्ट्रातील मतदारांनी दिले आहे.
या निवडणुकीच्या निकालात दडलेला संदेश असा आहे की, जेव्हा तुम्ही तुमची प्रतिष्ठा आणि अशा प्रकारे कौटुंबिक प्रभाव या पलीकडे जाऊन सत्तेत राहण्यासाठी एवढी मेहनत करणार्या पक्षासोबत लोकांनी का राहू नये? कोट्यवधी महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम हस्तांतरित करणे, उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘गद्दारी’चा शिक्का लावला गेल्यानंतर तो पूर्णपणे अपयशी ठरवणे यामागे शिंदे यांची विनम— पार्श्वभूमी, त्यांची लोकांशी असलेली जवळीक आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता दर्शवते. तसेच राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते; मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी ते कोणती दिशा घेतील, हे स्पष्ट नाही. त्यांचे पुतणे अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या निराशाजनक कामगिरीपेक्षा कितीतरी अधिक भक्कम जनादेश मिळवून खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. आता असे होऊ शकते की, शरद पवार यांच्यासोबत राहिलेल्या पक्षात फूट पडून काही अजित पवार यांच्याकडे, तर काही काँग्रेसमध्ये जातील. असे झाल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात येईल. असं असलं तरी राष्ट्रवादी हा मुळातच असा पक्ष आहे, ज्यात हितसंबंधांचे प्राबल्य दडलेले आहे. त्यांना संरक्षण दिल्यास ते कुठेही जाऊ शकतात. महाराष्ट्राचे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपापल्या पक्षांपासून फारकत घेऊनही आपापल्या पक्षांचा वारसा पूर्णपणे हाती घेतला आहे. हे मिशन पूर्ण करण्यात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चमत्कारिक नेतृत्वाचे योगदान नाकारता येणार नाही.
या निवडणुकीचा सर्वात मोठा संदेश सर्व राजकीय पक्षांसाठी आहे, तो म्हणजे भाजप. भाजपबद्दल एका वाक्यात बोलायचे झाले, तर पराभवाच्या तोंडातून विजय हिसकावून घेण्यासाठी भाजप नेहमीच तयार असतो. हरियाणापाठोपाठ महाराष्ट्राच्या निवडणुकीतील विजयाने हे पुन्हा सिद्ध झाले आहे. यावर महाराष्ट्राच्या जनादेशाने अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. विरोधकांमध्ये निर्दयपणे फूट पाडण्यात भाजपची बरोबरी कोणी करू शकत नाही, हे या जनादेशावरून दिसून येते. भाजपने नेहमीच स्वबळावर निवडणूक अजेंडा ठरवला आहे. विरोधकांना भाजपचा अजेंडा पाळणे भाग पडले आहे. ‘एक है तो सेफ है’ या भाजपच्या घोषणेने विजयाचा एवढा भक्कम पाया रचला की, विरोधकांना तो हादरवता आला नाही. आरएसएसने मराठा आणि ओबीसी यासारख्या सामाजिक घटकांवर खूप मेहनत घेतली. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला पुन्हा आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. यासोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याआधीच्या हरियाणातील पराभवातून काँग्रेसने कोणताही धडा घेतला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. हरियाणाच्या निकालातून काँग्रेस नेतृत्व आणि त्यांच्या नेत्यांनी धडा घेतला असता, तर महाराष्ट्रात अशी शोकांतिका घडली नसती. काँग्रेस सन्मानजनक स्थानावर पोहोचू शकली असती; पण असे झाले नाही.