चांदवड-देवळा मतदारसंघामध्ये डॉ. राहुल आहेर यांची विजयी हॅटट्रिक:निंबाळकर, केदा आहेरांचा पराभव; कोतवाल यांना तिसऱ्यांदा दिली मात
2 hours ago
1
चांदवड-देवळा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपाचे उमेदवार आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विजयाची हॅट्रीक करत भाजपाचा गड कायम राखला. त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गणेश निंबाळकर यांचा ४८,९६१ एवढ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणूकीत त्यांनी चुलतबंधू केदा आहेर यांनाही पराभवाची धूळ चारली. आठवी पंचवार्षिक निवडणूक लढवणारे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजयश्री मिळवली. चांदवड मतदारसंघ तिकीट वाटपावरुन झालेल्या नाट्यामुळे चर्चेत आला होता. आ. आहेर यांनी कौटुंबीक संघर्ष टाळण्यासाठी आपले चुलतबंधू भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व नाफेडचे संचालक केदा आहेर यांना तिकीट देण्याची शिफारस वरीष्ठ नेत्यांकडे केली होती. मात्र, भाजपाच्या सर्व्हेत डॉ. आहेर यांचे प्राबल्य असल्याचे कारण देत महायुतीकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे केदा आहेर यांनी बंडाचे निशाण फडकावत चांदवड-देवळा परिवर्तन विकास आघाडीतर्फे अपक्ष उमेदवारी करत डॉ. आहेर यांना ‘घरचा आहेर’ दिला होता. या निवडणूकीत गणेश निंबाळकर यांनी मतदारसंघ पिंजून काढत शेतकरी, सर्वसामान्यांना साद घातली. अपक्ष केदा आहेर यांनी चांदवडमधील मातब्बरांना सोबत घेत प्रचार यंत्रणा उभारली. भावाकडून अन्याय झाल्याचे सांगत जनतेला भावनिक साद घातली. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दोन्ही भावांना नाकारत महाविकास आघाडीला साथ देण्याचे जनतेला आवाहन केले होते. मात्र, डॉ. आहेर यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर न देता गेल्या द१० वर्षात केलेल्या विकासकामांच्या प्रचारावर जोर देत मतदारांना साद घातली. मातब्बर नेते पाठीशी नसताना कार्यकर्त्यांना सोबत घेत डॉ. आहेर यांनी सक्षमपणे प्रचार यंत्रणा राबवली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे त्यांचा मतांचा टक्का वाढल्याचे मानले जाते. चांदवड येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेल्या कॅबीनेट मंत्रीपदाचा शब्दही डॉ. आहेर यांना फायदेशीर ठरला. या निवडणूकीत चांदवड व देवळ्यातून प्रत्येकी दोन मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. २०१४ मध्ये प्रांतवाद होऊन चांदवड तालुक्यातील उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभागणीमुळे डॉ. राहुल आहेर यांनी बाजी मारली होती. तर २०१९ च्या निवडणूकीत डॉ. आहेर व माजी आमदार कोतवाल यांच्यात सरळ लढत होऊन डॉ. आहेर यांनी दुसऱ्यांदा विजयश्री मिळवली होती. या निवडणूकीत मात्र, देवळा तालुक्यात मतविभाजन होऊन चांदवड तालुक्यातील उमेदवाराच्या विजयाची अटकळ बांधली जात होती. मात्र, विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड व देवळ्यात ४८,९६१ मतांचे प्राबल्य मिळवत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. डॉ. राहुल आहेर - ५३,७०९ केदा आहेर -२६,१७० गणेश निंबाळकर - ५,६७९ शिरीष कोतवाल - २,८७७
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)