Published on
:
25 Nov 2024, 12:41 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:41 am
पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांचा विक्रमी मतांनी विजयी झाला. यावेळची निवडणूक ही निश्चितच तिरंगी व अटीतटीची होईल याची सार्वत्रिक चर्चा व तशीच राजकीय परिस्थिती असतानाही ऐनवेळी देसाई यांनी तब्बल 34,824 मताधिक्यांची घेतलेली आश्चर्य व अनपेक्षित आघाडीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या मतदारसंघांप्रमाणेच राज्यातही महायुतीला मिळालेले अनपेक्षित व घवघवीत यश लक्षात घेता सर्वसामान्यांकडून याबाबत कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महायुतीकडून आ. शंभूराज देसाई तर महाविकास आघाडीकडून सत्यजितसिंह पाटणकर यांची उमेदवारी व दुरंगी लढत निश्चित मानली जात होती. महायुतीकडून देसाईंना उमेदवारी मिळाली परंतु ऐनवेळी महाविकास आघाडीने शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख भानुप्रताप ऊर्फ हर्षद कदम यांना अनपेक्षित उमेदवारी देत येथे आश्चर्यजनक राजकीय धक्का दिला. त्यानंतर आजवर राष्ट्रवादी तथा शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या पाटणकर गटांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला व या अन्यायाच्या विरोधात पदाधिकारी, कार्यकर्ते व पाटणकर गटाच्या मतदारांनीही अपक्ष लढण्याचा जाहीर निर्णय घेतला.
त्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जनसामान्यातून त्यांना प्रचंड मोठा प्रतिसादही पहायलाही मिळाला. एका बाजूला देसाईंचा विकासाचा अजेंडा घेऊन तर दुसरीकडे सत्यजितसिंह पाटणकरांसह अगदी हर्षद कदम यांचाही कमालीचा प्रचार पाहायला मिळाला. देसाईंनी विकासाच्या मुद्द्यावर मते मागण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विरोधी पाटणकर व कदम यांनी याच पाच वर्षाच्या काळात कमिशन, टक्केवारी, भ्रष्टाचार, मलिदा गँगच्या आरोपांवरून अक्षरशः रान पेटवले. विरोधकांना प्रचारावेळी मिळालेला प्रचंड प्रतिसाद व पाटणकर गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अगदी महिला, तरुण-तरुणी मतदारांनीही कमालीचे व शर्थीचे प्रयत्न लक्षात घेता ही निवडणूक ही अतिशय काटे की टक्कर बनेल आणि कोणाचाही निसटता विजय, पराभव होईल अशा शक्यता सर्वसामान्य मतदारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रशासकीय यंत्रणांमधून देखील वर्तविल्या जात होत्या.
मतमोजणीच्या दरम्यान नेमकी उलट परिस्थिती पहायला मिळाली आणि येथे एकूण झालेल्या 2,31,484 मतदानापैकी शंभूराज देसाईंना तब्बल 1,25,79 तर सत्यजित पाटणकर यांना 90,936 व महाविकास आघाडीच्या हर्षद कदम यांना 9626 मते मिळाली. सन 2019 च्या तुलनेत सत्यजितसिंह पाटणकर यांना जवळपास सरासरी इतकीच मते मिळाली. त्याचवेळी शंभूराजे देसाईंना ज्यादा 19 हजार मते मिळाली आहेत. अन्य पक्ष अपक्षांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
एकूणच या निवडणुकीचा निकाल हा देसाई गटासाठी अत्यंत प्रेरणा व ऊर्जादायी ठरणार आहे. त्याचवेळी पाटणकर गटाला आत्मचिंतन करायला लावणारा असला तरी यावेळी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही अथक प्रयत्न घेतले होते. त्यातूनही याचे राजकीय गणितं नक्की कोणाचे व कुठे चुकले हे आता या गावनिहाय मतांच्या आकडेवारीनंतरच स्पष्ट होणार आहे.