बाराही महिने खवय्यांचे चोचले पुरवणारी शेवंड अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, रेवदंडाच्या समुद्रातून गायब झाली आहे. वातावरणातील बदलाचा फटका याला कारणीभूत आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने 700 रुपये किलोने मिळणारी शेवंड आता 1100 ते 1800 रुपये किलोने विकली जात आहे. दर वाढल्याने खवय्यांच्या खिशाला कात्री लागली असून मुबलक प्रमाणात शेवंड मिळत नसल्याने मच्छीमारांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
स्थानिक आणि पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक फायदा मिळवून देणारी आणि आखाती देशात मोठ्या प्रमाणावर शेवंडला मागणी आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे लॉबस्टर मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने स्थानिक मच्छीमार अडचणीत आले आहेत. प्रत्येक वर्षी समुद्रातून शेवंड मिळण्याच्या प्रमाणात मोठी घट होत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांकडूनही मागणीप्रमाणे शेवंडचा पुरवठा होत नाही. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, रेवदंडा व इतर परिसरातून शेकडो स्थानिक मच्छीमार शेवंड (लॉबस्टर) विक्रीसाठी घाऊक बाजारात घेऊन येतात. दररोज सुमारे 450 ते 500 किलो शेवंड खरेदी केली जाते.
आखाती देशात मोठी मागणी
समुद्रातील खडकाळ किनाऱ्यावर अथवा वाळूमय पाण्याच्या ठिकाणी या शेवंड आढळून येतात. स्थानिक मच्छीमार छोट्या होड्यांनी शेवंड मासळी पकडतात. आखाती देशात या मासळीला मोठी मागणी आहे. 1 नंबर सदरात मोडणाऱ्या शेवंडीचे वजन 300 ते 1500 ग्रॅम भरते. 1600 ते 1800 रुपये किलो प्रति दराने या शेवंडींची घाऊक बाजारात विक्री होते. 100 ते 250 ग्रॅम वजनाची शेवंड 2 नंबरच्या सदरात मोडते. या दोन नंबरच्या शेवंडींना प्रति किलो 1100 ते 1200 रुपये भाव मिळतो.