हिंगोली तालुक्यातील येहळेगाव सोळंके फाट्यावरील घटना
हिंगोली (Hingoli Crime) : औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके फाट्यावर आयशर वाहन गावातून रस्त्यावर येत असताना काही लोकांनी महिला गावात आणून सोडल्याचा आरोप करून आयशर वाहन अडवून ठेवले होत. याचवेळी घटनास्थळी पोलीस शासकीय काम करीत असताना पोलीस पैसे वाटप करीत असल्याची खोटी अफवा समाज माध्यमावर पसरवून व्हिडीओ व्हायरल केल्याने औंढा नागनाथ पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० दरम्यान आयशर वाहन क्रमांक एम.एच.०४-एफ.डी.९३९२ यामधून गावात महिला आणून सोडल्या, असा आरोप करून वाहन अडविल्याने घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण नागरे व कर्मचारी तात्काळ धावून गेले. त्यांनी चालकाला विचारणा केल्यावर चिंतामणी मंदीर येथून महिलांना आणून सोडले. चालकाच्या बाजूने अज्ञात व्यक्तीने काचेला धरून आयशरवर चढतेवेळी ती फुटून खाली पडल्याची फिर्यादी संजय पांडे यांनी दिल्याने अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान या प्रकरणात सपोनि अरूण नागरे यांनी तक्रार दिली. ज्यामध्ये ते शासकीय काम करीत असताना शिवाजी कर्हाळे यांनी त्यांना शिवीगाळ करून अटकाव केला व शासकीय कामाचा व्हिडीओ काढून पोलीस पैसे वाटप करीत असल्याची खोटी अफवा समाज माध्यमांद्वारे पसरविली. माणिकराव करडीले यांनी सदरचे खोटे विधान केलेला व्हिडीओ समाज माध्यमावर पसरवून पोलिसांबद्दल खोटे विधान पसरविल्याने १९ नोव्हेंबरला शिवाजी अशोक कर्हाळे रा.धारखेडा, माणिकराव करडीले रा.काकडदाभा या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे हे करीत आहेत.