समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांच्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. “महाकुंभमध्ये चेंगराचेंगरील मरण पावलेल्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्यामुळे उत्तर प्रदेशात प्रयागराजच्या नदीच पाणी प्रदूषित झालय” असा विचित्र दावा जया बच्चन यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा विश्व हिंदू परिषदेने समाचार घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेने जया बच्चन यांच्या अटकेची मागणी केली आहे. जया बच्चन यांचं हे वक्तव्य दुर्देवी असून अस्थिरता निर्माण करणारं आहे असं VHP ने म्हटलं आहे.
“उच्च पदावर बसलेल्या खासदाराच हे वक्तव्य देशात अस्थिरता निर्माण करणारं आहे” असं वीएचपीचे मीडिया प्रभारी शरद शर्मा म्हणाले. खोट बोलून सनसनाटी निर्माण करणाऱ्या जया बच्चन यांना अटक केली पाहिजे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. महाकुंभ म्हणजे आस्था आणि भक्ती. तिथे धर्म, कर्म आणि मोक्षाची प्राप्ती होते. कोट्यावधी भाविकांच्या भावना या महान अनुष्ठानशी जोडलेल्या आहेत” असं VHP ने म्हटलय.
‘लोकांसाठी काही व्यवस्था नाहीय’
संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना जया बच्चन यांनी दावा केला की, “सध्या सर्वात जास्त पाणी कुठे प्रदूषित आहे?, इथे कुंभमध्ये. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांचे मृतदेह नदीत फेकून दिलेत. त्यामुळे पाणी दूषित झालय” “कुंभमध्ये वास्तविक मुद्यांकडे लक्ष दिलं जात नाहीय. महाकुंभसाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी काही व्यवस्था केलेली नाही. ना कुठल्या विशेष सुविधा मिळतायत” असं जया बच्चन बोलल्या आहेत.
‘पोस्टमार्टम न करता मृतदेह पाण्यात टाकले’
महाकुंभमध्ये भाविकांच्या उपस्थिती संदर्भात यूपी सरकारने दिलेल्या आकड्यांवर जया बच्चन यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. “यूपी सरकार खोटं बोलत आहे. कोट्यवधी लोक त्या ठिकाणी आहेत. कुठल्यावेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक तिथे कसे एकत्र येऊ शकतात? सरकारने सत्य सांगितलं पाहिजे, कुंभमध्ये काय झालं?. संसदेत सांगितलं पाहिजे. प्रशासनाने पोस्टमार्टम न करता मृतदेह पाण्यात टाकले” असं जया बच्चन म्हणाल्या. “कुंभमध्ये झालेली चेंगराचेंगरी हा देशातील एक मोठा मुद्दा आहे. सरकारने योग्य आकडा सांगितला पाहिजे. संसदेत दुटप्पी गोष्टी बोलू नयेत. जनतेला स्पष्टीकरण दिलं पाहिजे” असं जया बच्चन म्हणाल्या.
किती जणांचा मृत्यू?
मागच्या आठवड्यात मौनी अमावस्येला महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात 30 जणांचा मृत्यू झाला. संगम येथे मौनी अमावस्येला दुसऱ्या अमृत स्नानासाठी लोक मोठ्या संख्येने आले होते. या घटनेने प्रयागराज येथे कुंभ मेळ्यासाठी केलेल्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण केलेत.