विधानसभेची धामधूम अंतिम टप्प्यात येत चालली असतांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरबाडमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीPudhari News Network
Published on
:
18 Nov 2024, 5:04 am
Updated on
:
18 Nov 2024, 5:04 am
मुरबाड शहर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे. या धोरणामुळेच मुरबाड मतदारसंघातही एमआयडीसीतील अनेक उद्योग बाहेर गेले. तर रोजगार निर्मिती न झाल्यामुळे बेरोजगारी वाढली. मुरबाडमधील प्रश्न सोडविण्यात किसन कथोरे सपशेल अपयशी ठरले, अशी टीका करीत असतानाच जयंत पाटील यांनी आजच्या सभेच्या गर्दीने महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचा आशावाद व्यक्त केला. विधानसभेची धामधूम अंतिम टप्प्यात येत चालली असतांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरबाडमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मुरबाड व बदलापूरकरांनी आमदार किसन कथोरे यांना अनेक संधी दिली. पण त्यांना मतदारसंघातील प्रश्न सोडविता आले नाहीत. बदलापूरातीलत्या घटनेनंतर तेथील मतदारांनीही किसन कथोरेंना बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचे ठरविले आहे. मुरबाड मतदारसंघात परिवर्तनाची भूमिका असून, आता परिवर्तन अटळ आहे, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणातून केले.
भाजप पक्ष संकटात आला असून, बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देऊन महाराष्ट्राला 18 व्या शतकात नेले जात आहे. पण शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणी हे सहन करणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी घणाघाती भाषणात आमदार किसन कथोरे यांच्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुरबाड मतदारसंघातील केळेवाडी येथील रस्त्याचे काम 15 वर्षात झाले नाही. या भागाला हेतुपुरस्सर टार्गेट करण्यात आले. काळू धरणाला विरोध असल्याचे सांगून, त्यांच्या बगलबच्च्यांकडून काळू धरणक्षेत्रातील गावांमध्ये घरपट्टीच्या पावत्या घेतल्या जात आहेत. जोता नसतानाही घर दाखवून लूट केली जात आहे.
मुरबाड तालुक्याचा संबंध नसलेला समृद्धी महामार्ग हा अहवालात छापला गेला. वडोदरा एक्सप्रेसवेच्या बोगद्यात जाऊन फोटो काढले गेले. खोटे बोला पण रेटून बोला, अशी त्यांची कार्यपद्धती आहे, असा आरोप सुभाष पवार यांनी केला. मुरबाड मतदारसंघातील 15 वर्षांचा आमदार निधी हा उद्यान सुशोभिकरण व बाकड्यांमध्ये खर्च झाला. 15 वर्षांपासून अरेरावी व दादागिरी सुरू असून, बघून घेण्याची भाषा केली जात आहे. तब्बल 15 वर्ष आमसभा न घेण्याचा पराक्रमही नोंदविला गेला, अशी टीका सुभाष पवार यांनी केली.