Published on
:
07 Feb 2025, 5:09 am
Updated on
:
07 Feb 2025, 5:09 am
पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीत शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी यांच्यासह बाजार समितीतील घटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या किसान थाळीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अवघ्या १० रुपयात बाजार समितीकडून ही थाळी उपलब्ध करून देण्यात येत असून आतापर्यंत एक लाख 63 हजार 695 लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
बाजार समिती आवारावर शेतकरी शेतमाल विक्रीस आणतात. मात्र, बाजार समिती आवार गावापासून दूर असल्याने शेतकऱ्यांसह बाजार समितीतील इतर घटकांना जेवनासाठी चांगली सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय हाेत होती. त्यामुळे बाजार समितीने सर्वच घटकांची जेवणाची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्वतः सहभाग घेवून फक्त 10 रुपयात किसान थाळी हा उपक्रम सुरू केला. या थाळीत डाळ, भात, सुकी भाजी, चपाती व ठेचा देण्यात येतो. या संपूर्ण थाळीची किंमत 45 रुपये प्रति लाभार्थी आहे. मात्र, लाभार्थींकडून केवळ 10 रुपये शुल्क आकारून उर्वरित 35 रुपये प्रती लाभार्थी रक्कम बाजार समिती संबंधित बचत गटास अदा करत आहे. जेवनाबरोबर शेतकरी बांधवांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी 200 लिटर प्रती तास या क्षमतेचे ॲक्वागार्ड बसविणेत आले आहे.
शेतकरी, व्यापारी, कामगार या सर्वांचे हित लक्षात घेता बाजार समितीने ५ फेब्रुवारी 2020 रोजी महिला बचत गटाच्या माध्यमातून किसान थाळीचा शुभारंभ केला.पाच वर्षांत या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापुढेही किसान थाळी सुरू राहणार असून चांगल्या प्रतीची सेवा देण्याचा आमचा मानस आहे.
दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती
महिला बचत गटाच्या माध्यमातून किसान थाळी चालवण्याची संधी आम्हाला मिळाली. मागील पाच वर्षांमध्ये चांगल्या प्रतीचे जेवण किसान थाळीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी आणि कामगारांना दिले आहे. यामुळेच शेकडो किलोमीटर वरून येणारे शेतकरी या थाळीचा आवर्जून लाभ घेतात. शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद असाच टिकून ठेवणार.
वृषाली कदम, संचालक, महिला बचत गट किसान थाळी, पिंपळगाव